कात्रज – स्वारगेट – हडपसर या मार्गापाठोपाठ नगर रस्त्यावर बीआरटी योजना सुरू करण्याचे नियोजन महापालिका व पीएमपीतर्फे केले जात असले, तरी नगर रस्त्यावरील बीआरटीचा मार्ग नागरिक, प्रवासी व वाहनचालकांसाठी धोकादायक असल्याचे उघड झाले आहे. या मार्गावर अनेक सुधारणा आवश्यक असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
पीएमपी प्रवासी मंच आणि सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेन्ट या स्वयंसेवी संस्थांतर्फे नगर रस्ता व आळंदी रस्त्यावरील बीआरटी योजनेचे सुरक्षिततेच्या दृष्टीने परीक्षण करण्यात आले होते. या परीक्षणाचा अहवाल या संस्थांनी प्रसिद्ध केला असून त्याची प्रत महापालिका व पीएमपीलाही देण्यात आली आहे. या अहवालातून अनेक त्रुटी उघड झाल्या आहेत. कात्रज ते हडपसर या प्रायोगिक तत्त्वावरील बीआरटी मार्गात ज्या त्रुटी आहेत, त्या नव्या बीआरटी योजनेत दूर करणे आवश्यक होते. मात्र, जुन्या मार्गातील सर्व त्रुटी नव्या मार्गातही दूर झालेल्या नाहीत. या मार्गावरील बसथांब्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले असले, तरी रोलरमधील दोषांमुळे हे दरवाजे एकाच जागेवर पक्के झाले आहेत. त्यामुळे थांब्यावर गाडी आल्यानंतर दरवाजा उघडेल की नाही, तसेच उघडला तर बंद होईल का नाही, ही भीती प्रवाशांना वाटणार आहे. या मार्गावर गतिरोधक तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने झेब्रा क्रॉसिंगही केलेले नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
आळंदी रस्त्यावर सोळा किलोमीटर अंतरात बीआरटी मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावर बसथांब्याची उंची ८८० मिलिमीटर इतकी आहे आणि पीएमपीच्या ताफ्यातील काही गाडय़ांची उंची ९०० मिलिमीटर तर काही गाडय़ांची उंची ८६० मिलिमीटर आहे. बसथांबे व गाडय़ांच्या उंचीतील तफावतीमुळे प्रवाशांना चढ-उतार करताना गैरसोय होणार असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.
 या योजनेसाठी निधी मिळवण्याकरता शासनाला एक माहिती दिली गेली आणि जागेवर वेगळेच काम करण्यात आले आहे, असे पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी यांनी सांगितले. योजनेचे काम पूर्ण झाल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगितले जात आहे. मात्र, अनेक कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. बसथांब्यांची कामे अपूर्ण आहेत तसेच काही थांब्यांवर अगोदरच मोडतोड झाली आहे, असेही राठी यांनी सांगितले.
बीआरटीचा मार्ग अन्य वाहनांना पूर्णत: बंद करणे आवश्यक असताना या मार्गावर दुचाकी चालक सहजरीतीने जाऊ शकतील अशी सदोष व्यवस्था तयार झाली आहे. काही ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी तयार केलेला मार्गच बंद करून टाकण्यात आला आहे. बीआरटीचा मार्ग अन्य वाहनचालकांना लक्षात येईल अशाप्रकारे फलक लावण्यात आलेले नाहीत, अशीही माहिती राठी यांनी दिली.