महापालिका आणि पीएमपीने संयुक्त प्रयत्न करून मंडईतून पीएमपीची सेवा सुरू केल्याबद्दल पीएमपी प्रवासी मंचने प्रशासनाचे अभिनंदन केले असून ‘मंडईपासून पाच रुपयांत प्रवास’ ही योजना सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीआरटी मोफत होऊ शकते, तर शहर बस सेवा स्वस्त का होऊ शकत नाही, अशीही विचारणा संघटनेने केली आहे.
पीएमपीने मंडईतून गाडय़ा सोडण्याबरोबरच नगर रस्ता बीआरटी मार्गावर एक महिना मोफत प्रवासाची योजना आखली आहे. बीआरटीची माहिती नागरिकांना व्हावी हा त्यामागील उद्देश आहे. ‘प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी, तसेच विश्वासार्हता वाढवण्यासाठी आणि पीएमपीची सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी या योजना उपयुक्त असून प्रवासीकेंद्रित सेवा दिल्यास प्रवासी निश्चितपणे चांगला प्रतिसाद देतील,’ असा विश्वास पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी यांनी पीएमपीला दिलेल्या पत्रातून व्यक्त केला आहे.
मंडईतून पीएमपी सेवा सुरू करण्याचे योग्य नियोजन करावे, मंडईतून दहा भागांत दहा मार्ग सुरू करावेत, त्या ठिकाणी तातडीने थांब्यांची उभारणी करावी, संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त करावा, गाडय़ांसाठी जागा मोकळी ठेवावी अशा सूचनाही या पत्रातून करण्यात आल्या आहेत. मंडईपासून पाच किलोमीटरच्या परिसरातील दहा मार्गावर पाच मिनिटांच्या वारंवारितेने (फ्रिक्वेन्सी) गाडय़ा सोडाव्यात आणि त्यांना सरसकट पाच रुपये तिकीट दर आकारावा. या योजनेची अंमलबजावणी केल्यास प्रवासीसंख्या निश्चितपणे वाढेल आणि मध्य पुण्यातील खासगी वाहने कमी होतील, असेही या पत्रात म्हटले आहे.
बीआरटी मोफत होऊ शकते, तर शहर बस सेवा स्वस्त का होत नाही?
‘मंडईपासून पाच रुपयांत प्रवास’ ही योजना सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीआरटी मोफत होऊ शकते, तर शहर बस सेवा स्वस्त का होऊ शकत नाही.
First published on: 26-12-2013 at 02:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brt pmp fule market pmp pravasi manch