खडकवासला मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी महापालिकेत बैठक घेतली. पुण्यातील बीआरटीसाठी आतापर्यंत एक हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, बीआरटी थांब्यांवरील कॅमेऱ्यांसाठी दहा कोटी रुपये का मंजूर होत नाहीत, अशा शब्दात सुळे यांनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांना प्रश्न केला. पत्रकार परिषदेत खासदार सुळे यांनी हा निधी मंजूर होत नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.
महापालिकेत खासदार सुळे यांनी खडकवासला मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत बैठक बोलावली होती. महापौर दत्ता धनकवडे, सभागृहनेता सुभाष जगताप, उपमहापौर आबा बागूल, स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ, विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता गेली बारा वर्षे आहे आणि तरीही बीआरटी, कचरा प्रक्रिया, पीएमपी यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प का पूर्ण झाले नाहीत, अशी विचारणा या वेळी पत्रकारांनी सुळे यांना केली असता पीएमपीची गाडय़ांची खरेदी तसेच मेट्रो प्रकल्प रखडला आहे हे मान्य आहे. मात्र नव्या मुख्यमंत्र्यांकडे मेट्रो प्रकल्प तसेच नेहरू योजनेतील विविध प्रकल्पांसाठी पाठपुरावा करणार आहोत. बीआरटी योजनेसाठी आतापर्यंत कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत. मग आता या योजनेतील कॅमेऱ्यांसाठी दहा कोटी रुपये तुम्हाला मिळत नाहीत का, अशीही थेट विचारणा खासदार सुळे यांनी या वेळी पदाधिकाऱ्यांकडे केली. त्यावर इतर पक्षांचा विरोध असल्यामुळे कॅमेरे खरेदीसाठी निधी उपलब्ध होत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.
विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीला कशाचा फटका बसला याबाबत बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, की या मतदारसंघात जे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत त्यांनी विकासकामे केली आहे. परंतु कात्रज बाह्य़वळण महामार्गावरील कामे रखडली आहेत. त्याबाबत संबंधित कंपनीला नोटीसही दिली आहे. रस्त्याच्या या रखडलेल्या कामाचा फटका निवडणुकीत बसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा