संपूर्ण शहराला समान पाणीपुरवठा, जलद बांधकाम परवानगीसाठी व्हिसाप्रणाली, भाडे तत्त्वावर सायकल योजना, रात्र निवारा प्रकल्प, जंगल सफारी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय, तारांगण, पाम पार्क, ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेकविध योजना, महिला व युवतींसाठी सक्षमीकरण योजना, पाळणाघरे, नागरिकांची दक्षता समिती.. ही आणि अशी अनेक आश्वासने महापालिका अंदाजपत्रकाच्या जाडजूड पुस्तकातच राहिलेली असताना आणखी दोनच दिवसात महापालिकेचे नव्या वर्षांचे अंदाजपत्रक सादर होणार आहे.
अंदाजपत्रकाच्या माध्यमातून पुणेकरांसाठी नवनव्या योजना मांडण्याचा सपाटा दरवर्षी आधी महापालिका प्रशासनाकडून लावला जातो आणि पुढे स्थायी समिती त्यात स्वत:च्या नव्या योजनांची भर घालते. सन २०१२-१३ च्या अंदाजपत्रकाबाबतही असाच प्रकार झाला आहे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे शुक्रवारी (२२ फेब्रुवारी) आगामी आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक मुख्य सभेला सादर करणार आहेत.
महापालिकेच्या कामकाजाला मदत करण्यासाठी बारा प्रतिष्ठित नागरिकांची दक्षता समिती नेमण्याची घोषणा चांदेरे यांनी अंदाजपत्रकाच्या माध्यमातून गेल्या वर्षी केली होती. त्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील या अंदाजपत्रकात विविध योजनांची घोषणा करण्यात आली होती. महिला आणि युवतींसाठी देखील अनेक योजनांचा समावेश करून त्याला महिला सबलीकरण असे नाव देण्यात आले होते. प्रत्यक्षात, यातील कोणतीही योजना वर्षभरात कार्यान्वित झालेली नाही.
सहावी ते दहावीतील जे विद्यार्थी सायकलवरून शाळेत जातात त्यांना प्रतिवर्षी एक हजार रुपये व पर्यावरणमित्र प्रमाणपत्र देण्याचीही घोषणा अंदाजपत्रकात करण्यात आली असली, तरी ती योजनाही अंदाजपत्रकातच राहिली आहे. लोकनेते यशवंतराव चव्हाण शहर स्वच्छता अभियानाचा मोठा गाजावाजा अंदाजपत्रकातून करण्यात आला होता. मात्र, भव्य उद्घाटन कार्यक्रम आणि जागोजागी कमानी याच्या पलीकडे या अभियानात कोणताही विशेष उपक्रम झालेला नाही.
नेहरू स्टेडियमच्या बाजूला कबड्डीसाठी बंदिस्त क्रीडांगण व प्रेक्षागृह, विविध ठिकाणी स्टेडियम, स्पोर्ट्स होस्टेल, नवी क्रीडांगणे, चार कोटी रुपये खर्च करून शिवाजी स्टेडियमची सुधारणा, समाविष्ट गावांमधील विकास आराखडय़ात दर्शविण्यात आलेल्या रस्त्यांचा विकास असे एक ना अनेक प्रकल्प या अंदाजपत्रकात घोषित करण्यात आले होते. मात्र, यापैकी कोणताही प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही.
पुढील अंदाजपत्रकांचा आधार?
हे अंदाजपत्रक पुढील अंदाजपत्रके तयार करताना आधार ठरू शकेल, असा दावा चांदेरे यांनी केला होता. तसेच हे अंदाजपत्रक म्हणजे पुण्याच्या वेगवान व समतोल विकासाला चालना देणारे आणि पुणेकरांचे स्वप्न साकारणारे ठरेल, अशी आशाही चांदेरे यांनी अंदाजपत्रकातून व्यक्त केली होती. मात्र, वेगवान आणि समतोल तर दूरच; पण अनेक प्रकल्प कागदावरच राहिल्यामुळे पुणेकरांना विकासकामे दिसलीच नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अशाच पद्धतीने महापालिका प्रशासनाच्या मूळ अंदाजपत्रकातही अनेक योजनांचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे, त्यांची अंमलबजावणी न झाल्यामुळे त्यातील अनेक योजना पुन्हा आगामी वर्षांच्या अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा