महापालिकेचे आगामी आर्थिक वर्षांचे (२०१५-१६) अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून अंदाजपत्रक तयार करण्यासाठी गेला आठवडाभर झालेल्या खास सभांनंतर अंदाजपत्रकाचे सर्वाधिकार स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांना शनिवारी देण्यात आले. महापालिका आयुक्तांनी तीन हजार ९९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले असून लवकरच हे अंदाजपत्रक स्थायी समितीमार्फत मुख्य सभेला सादर केले जाईल.
महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केलेल्या अंदाजपत्रकाला अंतिम रूप देण्यासाठी स्थायी समितीच्या खास सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी अंदाजपत्रकाचे सर्वाधिकार अध्यक्षांना देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला व तो एकमताने संमत करण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष कर्णे गुरुजी हे आता अंदाजपत्रकाला अंतिम रूप देतील आणि ते मुख्य सभेला सादर केले जाईल.
स्थायी समितीमार्फत मुख्य सभेला २० फेब्रुवारीपर्यंत अंदाजपत्रक सादर केले जाणार असल्याचे कर्णे गुरुजी यांनी सांगितले. आयुक्तांनी प्रस्तावित केलेली १८ टक्के करवाढ फेटाळण्याचा निर्णय स्थायी समितीच्या खास सभेत शुक्रवारी घेण्यात आला. करवाढीच्या प्रस्तावामुळे उत्पन्नात वाढ होईल असे गृहित धरण्यात आले होते. पुढील वर्षांच्या उत्पन्नातील अपेक्षित वाढीसाठी करवाढ न करता थकित करवसुलीला प्राधान्य देण्याची सूचना स्थायी समितीकडून प्रशासनाला करण्यात आली असून ज्या मिळकतींना अद्याप कर लागू झालेला नाही अशा मिळकतधारकांसाठी अभय योजनाही लागू केली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर करवसुली होऊ शकते, असे स्थायी समितीचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा