पर्यटन आराखडा गुंळाडून ठेवला, पवना नदी सुधार योजनेला केराची टोपली दाखवली, विकासकामांच्या नावावर कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे, निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत, कोटय़वधींची थकबाकी वसूल होत नाही, ‘सारथी’चे बारा वाजले, अशा शब्दात सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीच सभेत ‘घरचा आहेर’ दिला, त्या सुरात विरोधकांनी सूर मिसळत िपपरी पालिकेच्या कारभाराचा अक्षरश: ‘पंचनामा’ केला.
छगन भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ बुधवारी तहकूब केलेली अंदाजपत्रकाची विशेष सभा दुपारी दोन वाजता पुन्हा सुरू झाली. महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली रात्री उशिरापर्यंत चाललेल्या सभेत प्रारंभी स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. त्यानंतर, आर. एस. कुमार, नारायण बहिरवाडे, झामाबाई बारणे, शमीम पठाण, सीमा सावळे, सुलभा उबाळे, अपर्णा डोके, सुरेश म्हेत्रे, अश्विनी चिंचवडे, शारदा बाबर, अनिता तापकीर, साधना जाधव, नीता पाडाळे, आशा शेंडगे, अश्विनी चिखले, भारती फरांदे, मंदा आल्हाट, स्वाती साने, बाळासाहेब तरस, अनंत कोऱ्हाळे, आशा सूर्यवंशी, आरती चोंधे, संगीता भोंडवे आदींनी रात्री आठ वाजेपर्यंतच्या चर्चेत सहभाग घेतला.
पाऊण तासाच्या भाषणात कुमार यांनी सदस्यांच्या प्रातिनिधीक भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘२४ तास पाणी’ देण्याची घोषणा करतात, अवघे दोन तास पाणी देण्याची बोंब आहे. मैदानांची दुरवस्था असून घरकुलची घरे बांधून तशीच पडून आहेत. तासाभराच्या भाषणात बहिरवाडे यांनी विविध सूचना केल्या. सुरक्षा यंत्रणा कुचकामी असल्याचे सांगत भटक्या कुत्र्यांची समस्या भीषण असल्याचे त्यांनी नमूद केले. सोम्या-गोम्याचे फ्लेक्स लागतात. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नाही, असे सीमा सावळे यांनी निदर्शनास आणून दिले. वृक्षलागवडीत घोटाळा असून कोटय़वधींच्या खर्चाचा हिशेब लागत नाही. त्यासाठी वृक्षगणना व्हायला हवी, असे त्या म्हणाल्या. रस्त्यांची वारंवार खोदाई नको, सिमेंटचे रस्ते करावेत, असे अश्विनी चिंचवडे यांनी सांगितले. अंदाजपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी, असे शारदा बाबर म्हणाल्या. काळेवाडीत पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अनिता तापकीर यांनी केली. नागरवस्ती विभागाचे काम बेजबाबदार आहे, याकडे नीता पाडाळे यांनी लक्ष वेधले. नगरसेवकांची तोंडे पाहून कामे केली जातात, अशी तक्रार झामाबाई बारणे यांनी केली. उद्यान विभागाची वाट लागल्याचे सांगत ‘स्काडा’ निरूपयोगी ठरल्याचे आशा शेंडगे यांनी नमूद केले. चिंचवडपेक्षा भोसरी मतदारसंघाचा अधिक विकास होत असल्याचे सांगून शमीम पठाण यांनी जास्त पदे घेणारी भोसरी सर्वच बाबतीत आघाडीवर असल्याचे नमूद केले. समाविष्ट गावांतील समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे बाळासाहेब तरस यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांवर ‘प्रहार’
पालिका अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर सदस्यांनी सडकून टीका केली. आयुक्त राजीव जाधव यांचा दरारा राहिला नाही. प्रवीण तुपे, सुरेश साळुंके फोन उचलत नाहीत. संजय कुलकर्णी यांनी पर्यावरण विभागाची वाट लावली आहे. लेखाधिकारी प्रमोद भोसले जबाबदारी झटकतात, पाटय़ा टाकण्याचे काम करतात. कायदा विभागाचे अधिकारी मॅनेज होतात आणि पालिकेचे आर्थिक नुकसान करतात. आपले अभियंते गवंडय़ासारखे काम करतात, अशा तीव्र भावना सदस्यांनी व्यक्त केल्या.
डॉ. डी. वाय. पाटील संस्थेकडे १८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ‘रुबी एलकेअर’ने ८५ लाखाचा कर थकवला आहे. मात्र, महापालिकेकडून त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यात येते.
-सुलभा उबाळे, गटनेत्या, शिवसेना.