पुणे : कोंढवा भागातील जमीन व्यवहारात मुंबईतील गुंड छोटा राजनचे नाव सांगून एक कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याला लष्कर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नरावडे यांनी लष्कर न्यायालयाचा आदेश रद्द करून विशाल अगरवाल याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
हेही वाचा >>> लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स, टायगर पॉईंटवर जायचंय? ‘या’ वेळेत जा, अन्यथा होणार कारवाई
छोटा राजनच्या नावाने धमकी देऊन फसवणूक प्रकरणात बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र ब्रह्मदत्त अगरवाल (वय ७७), मुलगा विशाल (वय ५०), जसप्रीतसिंग राजपाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत मुश्ताक शब्बीर मोमीन (वय ४५, रा. कौसरबाग, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणात सुरेंद्र अगरवाल, तसेच जसपीतसिंग राजपाल यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. विशाल अगरवालला लष्कर न्यायालायने येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाच्या विरोधात तपास अधिकाऱ्यांनी अगरवालला पोलीस कोठडी मिळावी, असा अर्ज केला होता. सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी याबाबतचा अर्ज दाखल केला होता.
अगरवाल याच्याकडे गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे, तसेच दूरध्वनी संभाषण आणि समाजमाध्यमातील संदेशाबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली होती. न्यायालायने युक्तिवाद ग्राह्य धरून अगरवालला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
हेही वाचा >>> बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार?
मुश्ताक मोमीन यांची एम. एम असोसिएट्स आणि वास्तू प्रॉपर्टीज एजन्सी आहे. मोमीन यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवून देणे, तसेच जमीन खरेदी-विक्री व्यवहार करण्यात येतात. आरोपी अगरवाल आणि जसप्रीतसिंग राजपाल यांचे कोंढव्यातील ब्रह्मा काऊंटी सोसायटीच्या परिसरात असलेल्या जमिनीवरून निवृत्ती कोपरे यांच्याशी वाद झाले होते. अगरवाल जुलै २०१९ मध्ये माेमीन यांना भेटले. जमिनीचा वाद मिटवून देणार का, अशी विचारणा केली. त्या वेळी परवानगी, तसेच अन्य कामे मार्गी लावून वाद मिटवून देतो, असे मोमीन यांनी त्यांना सांगितले. या प्रकरणात मध्यस्थी केल्यास दीड कोटी रुपये देण्याचा करार करण्यात आला होता. अगरवाल आणि राजपाल यांनी मोमीन यांना हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी १८ लाख रुपये आगाऊ दिले होते. उर्वरित एक कोटी ३२ लाख रुपये जमिनीसंदर्भातील कामे पूर्ण झाल्यानंतर देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले होते. मोमीन यांनी पैैशांबाबत विचारणा केली. तेव्हा आरोपी अगरवाल यांनी छोटा राजनच्या नावाने मोमीन यांना धमकावले होते. राजन टोळीला सांगून तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना जीवे मारू, अशी धमकी दिली होती.