पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात गु्न्हा दाखल झालेला बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलाला दिल्लीतील एका शैक्षणिक संस्थेने प्रवेश नाकारल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. मुलाच्या वकिलांनी याबाबतची माहिती न्यायालयात दिली. पुणे पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाविरुद्ध अंतिम तपास अहवाल बाल न्याय मंडळात (जेजेबी) गुरुवारी सादर केला. रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, तसेच कटात अल्पवयीन मुलगा सामील असल्याचे पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

हेही वाचा >>> पुणे : चोरट्यांचा आंबा बर्फीवर ताव; मिठाई विक्री दुकानातून रोकड, अडीच किलो आंबा बर्फी चोरीस

बाल न्याय मंडळात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे आणि सहायक वकील सारथी पानसरे यांच्यामार्फत मुलाविरुद्ध २०० पानी तपास अहवाल (सप्लिमेंटरी फायनल रिपोर्ट) सादर केला. रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, तसेच कटात अल्पवयीन मुलगा सामील असल्याचे पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी मुलाविरुद्ध पुरावा नष्ट करणे (भादंवि २०१), (बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक (भादंवि ४६७), कट रचल्याप्रकरणी (१२० ब) कलमवाढ केली आहे.

अगरवाल याच्या मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या आदेशाने त्याचा ताबा नातेवाइकांकडे सोपविण्यात आला आहे. मुलगा बारावी उत्तीर्ण आहे. मुलाला दिल्लीतील एका शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाला होता. मात्र, कल्याणीनगर अपघात प्रकरणात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळताच संस्थेने त्याला प्रवेश नाकारला, अशी तक्रार मुलाच्या वकिलांनी बाल न्याय मंडळात केली. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनीही त्याला हरकत घेतली नाही. मुलाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. मात्र, बाल न्याय मंडळाने याबाबत कोणताही आदेश दिला नाही वा कसलीही सूचना संबंधित शैक्षणिक संस्थेला केली नाही.

हेही वाचा >>> रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष परशुराम वाडेकर यांना जीवे मारण्याची धमकी – डॉक्टरविरुद्ध बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी झालेल्या अपघातात संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. बांधकाम व्यावसायिक अगरवालच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी परदेशी बनावटीची महागडी मोटार (पोर्श) जप्त केली होती. अगरवाल आणि त्याची पत्नी शिवानी यांनी ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांना पैसे देऊन मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मुलाने मद्यप्राशन केल्याचा संशय असल्याने पोलिसांनी रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससूनमध्ये तपासणीसाठी पाठविले होते. त्या वेळी शिवानीने मुलाऐवजी स्वत:च्या रक्ताचे नमुने दिले होते. तपासात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अगरवाल, डॉ. तावरे, डॉ. हाळनोर यांच्यासह १६ जणांना अटक केली होती. आरोपींमध्ये अगरवालला मदत करणाऱ्यांचा समावेश होता. या प्रकरणात अगरवालसह अन्य आरोपींविरुद्ध पुणे पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयात ९०० पानी आरोपपत्र सादर केले होते.