पुणे : देशभरात यंदा जुलै ते सप्टेंबर तिमाहीत घरांच्या विक्रीत घट झाली आहे. त्यातच रिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याज दरात कोणतीही कपात करणे टाळले. यामुळे गृहनिर्माण क्षेत्राच्या वाढीबाबत शंका उपस्थित झाली आहे. असे असतानाही बांधकाम व्यावसायिकांमध्ये आगामी काळात घरांच्या विक्रीत वाढ होण्याबाबत आशादायी चित्र आहे.
यंदा जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत घरांच्या विक्रीत देशातील प्रमुख सात महानगरांत गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्के घट झाली. याचवेळी नवीन घरांचा पुरवठा १९ टक्क्यांनी कमी झाला. तसेच, घरांच्या किमती २३ टक्क्यांनी महागल्या आहेत. पितृपक्ष असल्याने गेल्या तिमाहीत घरांची विक्री कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत पितृपक्ष असतानाही घरांची विक्री यंदापेक्षा जास्त होती. त्यामुळे आगामी काळात गृहनिर्माण क्षेत्राच्या वाढीबाबत शंका उपस्थित होत आहे.
आणखी वाचा-हडपसरमध्ये खोक्यात सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात कपात केल्याने रिझर्व्ह बँकेकडूनही असे पाऊल उचलले जाईल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात रिझर्व्ह बँकेने व्याज दरात कपात करणे टाळले आहे. परवडणारी घरे घेणारा ग्राहक हा कायम व्याजदरांचा विचार करून घर खरेदी करतो. आता व्याज दर कपात लांबणीवर पडल्याने त्याच्याकडून घर खरेदी लांबणीवर टाकली जाण्याची शक्यता आहे. असे असतानाही बांधकाम व्यावसायिक मात्र आगामी काळात घरांची विक्री वाढण्याबाबत आशादायी आहेत.
याबाबत अनारॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले की, आगामी सणासुदीच्या काळात घरांच्या विक्रीत वाढ होईल. व्याज दर कपातीकडे ग्राहकांचे लक्ष लागले होते. ही कपात झाली नसली तरी सध्या गृह कर्जाचे दर परवडणारे आहेत. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळाच घरांच्या खरेदीत वाढ होईल. घरांच्या किमती मागील काही काळात वाढल्या आहेत. आता त्या स्थिरावू लागल्यानेही ग्राहकांचा घर खरेदीकडे ओढा वाढेल. यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीतील घरांची विक्री गेल्या वर्षातील याच कालावधीप्रमाणे असेल.
आणखी वाचा-पावसामुळे फळभाज्यांची आवक कमी; कोबी, फ्लॉवर, शेवगा, मटारच्या दरात वाढ
रिझर्व्ह बँकेने व्याज दरात बदल केलेला नाही. हा निर्णय कच्च्या मालाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असताना गृहनिर्माण क्षेत्राला काहीसा दिलासा देणारा आहे. गृहनिर्माण क्षेत्र हे देशातील रोजगार निर्माण करणारे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) ८ टक्के वाटा असून तो येत्या काही वर्षांमध्ये १४ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. -रणजीत नाईकनवरे, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो
घरांची विक्री
शहर | जुलै ते सप्टेंबर २०२३ | जुलै ते सप्टेंबर २०२४ |
मुंबई | ३८,५०५ | ३६,१९० |
पुणे | २२,८८५ | १९,०५० |