नवी पेठेतील अनुदत्त अपार्टमेन्टच्या पार्किंगमधील वाहनांना लागलेल्या आगीत एका तरुणाचा गुदमरून मृत्यू झाला. तर तिघे भाजले असून त्यामध्ये एका दाम्पत्याची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच २५ नागरिकांना सुखरूप काढून चाळीस मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत पार्किंगमधील अठ्ठावीस दुचाकी जळून खाक झाली. आगीचे कारण समजू शकलेले नाही.
बालाजी मदनमोहन जाजू (वय २५, मूळगाव- चलबुर्गा, ता. कोटम, कर्नाटक) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर, गौरव महावीर अतुनीकर (वय ३१) आणि शालमली गौरव अतुनीकर (वय ३१, रा. मूळ गाव दोघेही- राजारामपुरी, कोल्हापूर) आणि अतुल नारायण अगरवाल (वय २५ रा. मूळगाव- वाशीम, अकोला) हे भाजले आहेत. यामध्ये अतुनीकर दाम्पत्याची प्रकृती गंभीर आहे. जाजू हा लेखापालचा अभ्यास करत होता. तर, अतुनीकर हे अर्किटेक्ट आहेत. अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवी पेठेत अनुदत्त अपार्टमेन्ट ही सहा मजली इमारत आहे. या मध्ये साधारण पंधरा सदनिका आहेत. तळमजल्यावर जिन्याजवळच पार्किंग असून जाण्यासाठी रस्ता अरुंद आहे. या इमारतीमध्ये आग लागली असल्याचा फोन अग्निशामक दलास पहाटे तीन वाजून ३५ मिनिटांनी आला. त्यानुसार पाच अग्निशामक गाडय़ा, दोन टँकर आणि दोन अ‍ॅब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या. त्या वेळी आगीच्या ज्वाला दुसऱ्या मजल्यापर्यंत गेल्या होत्या. इमारतीमध्ये साधारण २५ ते ३० नागरिक अडकले होते. इमारतीमधील सदनिकांना एका बाजूने गॅलरी आहे. मात्र, त्यांना ग्रिल असल्यामुळे बाहेर काढता येत नव्हते. त्यात दुचाकीच्या पेट्रोलच्या टाक्या फुटल्यामुळे आगीच्या ज्वाला भडकत होत्या. काही नागरिकांनी गॅलरी आणि टेरेसचा आधार घेतला होता. इमारतीमधून धुराचे लोट बाहेर पडत होते. सर्वत्र आरडा-ओरडा सुरू होता.
इमारतीच्या दोन्ही बाजूने रस्ता असल्याने दोन्ही बाजूकडून आग विझविण्याच्या काम सुरू होते. पहिल्या मजल्यावरील सदनिका ही संजय पवार यांच्या मालकीची होती. त्यांच्या गॅलरीला एक दरवाजा होता. त्यामधून पहिल्यांदा सहा महिन्याच्या लहान बालकास सुखरूप काढून नंतर पाच जणास बाहेर काढले. इमारतीमध्ये जाण्यासाठी छोटासा बोळ असल्यामुळे आतमध्ये जाण्यास अडचण येत होती. आग ही पार्किंगमध्ये लागली होती. पार्किंग ही जिन्याजवळ असल्यामुळे नागरिकांना खाली येता येत नव्हते. त्यात दुचाकीच्या पेट्रोलच्या टाक्यांचे स्फोट होत होते. आगीमुळे सर्व सदनिकांमध्ये धूर घुसला होता. जवानांनी आत आडकलेल्या नागरिकांना वरच्या मजल्यावरून शेजारच्या इमातीमध्ये नेऊन सुटका केली, अशी माहिती एरंडवणा केंद्राचे प्रमुख राजेश जगताप यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, प्रकाश गोरे, प्रभाकर उंबरटकर, जगताप आणि तीस ते ३५ जवानांनी चाळीस मिनिटांमध्ये ही आग आटोक्यात आणून नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. या आगीमध्ये २५ दुचाकी आणि दोन सायकल जळून साधारण पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सानप हे अधिक तपास करत आहेत.
आग लागलेल्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहणारे चंदन मधुकर पवार यांनी सांगितले, की या घटनेत मृत्यू झालेला जाजू हा सहाव्या मजल्यावरील ६०२ क्रमांकाच्या सदनिकेत मित्रासोबत राहत होता. तो शिक्षण घेत घेत नोकरी करत होता. साधारण दोन वाजून ५५ मिनिटांनी ही आग लागली होती. आग लागल्यानंतर जाजू हा खाली पळत आला. पहिल्या मजल्यावर आल्यानंतर धुरामुळे गुदमरला गेला आणि त्या ठिकाणीच कोसळला. अतुनीकर दाम्पत्य हे दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत राहतात. आग लागल्यानंतर जिन्यातून खाली जाण्याचा प्रयत्न करत होते. पण, त्याच वेळी दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीचा स्फोट झाल्याने ते गंभीर रीत्या भाजले. दोघेही नोकरी करतात असून त्यांचे आई-वडील काही दिवसांपूर्वी कोल्हापूरला गेले होते. या आगीत सर्व दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.