पुण्यातील आयोजकांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त भोरजवळ डर्ट ट्रॅक रेसिंगची स्पर्धा भरवली आहे. विशेष म्हणजे त्यात हलक्या वजनाच्या मोटारसायकली नव्हे, तर भरभरक्कम वजनाच्या बुलेट मोटारसायकलस्वारांना सहभागी होता येणार आहे. याचबरोबर या ट्रॅकवर स्लो रेसिंग, टो युवर बाईक, कॅरी युवर बाईक, फिगर ऑफ एट अशा स्पर्धाही रंगणार आहेत.
पुण्यातील किंग्ज अॅटोरायडर यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. भोरजवळील वडवाडी येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी (१५ ऑगस्ट) सकाळी १० वाजता या स्पर्धा सुरू होणार आहेत. तरुणांना रायडिंग या प्रकाराची रूची वाढावी या हेतूने ही स्पर्धा भरवण्यात येणार आहे. त्यात सुमारे तीनशे स्पर्धक सहभागी होणार आहेत. डर्ट ट्रॅक रेसिंगमध्ये माती आणि चिखलाच्या ट्रॅकवर मोटारसायकल चालवण्याचे कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. त्यासाठी अनुभवी आणि या खेळाची माहिती असलेल्या निवडक रायडर्सना प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय बाईक ‘टो’ करून नेणे, उचलून नेणे, विशिष्ट प्रकारे चालवणे या प्रकारांचाही या स्पर्धामध्ये समावेश आहे. या स्पर्धाना प्रमुख पाहुणा म्हणून मिस्टर युनिव्हर्स आणि मिस्टर वर्ल्ड हे किताब मिळवलेला शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले उपस्थित राहणार आहे. तो स्वत:ही त्याच्या मोटारसायकलसह स्पर्धेत सहभागी होणार आहे.
पुण्यातील तरुणांमध्ये रायडिंगची रूची वाढत आहे. विविध प्रकारच्या मोटारसायकली वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे. वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेणारे आणि रायडिंगचे विक्रम करणारे अनेक तरुण पुण्यात आहेत. त्यामुळे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. विशेषत: हा साहसी क्रीडाप्रकार वाढीस लागावा हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे, असे या आयोजनात असलेला रायडर रोहन पानघंटी याने सांगितले.
प्रमुख सहा प्रकारच्या स्पर्धा..
डर्ट ट्रॅक रेसिंग
स्लो रेसिंग
फिगर ऑफ एट
कॅरी युवर बाईक
टो युवर बाईक
आर्म रेसलिंग