वाहनचोरीसह आठ गुन्हे उघड; पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी तसेच दुचाकी चोरीचे गुन्हे करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने पकडले. चोरट्यांकडून दागिने, तीन दुचाकी असा चार लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरट्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.

रेवण उर्फ रोहन बिरु सोनटक्के (वय २३, रा. गणपती माथा, वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. सिंहगड रस्ता परिसरात काही दिवसांपूर्वी सदनिकेचे कुलुप तोडून ऐवज लांबविण्यात आला होता. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडून तपास करण्यात येत होता. चोरलेले दागिने कोथरुडमधील एका सराफी पेढीत विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर आणि ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळाली.

सापळा लावून त्याला पकडण्यात आले. चौकशीत त्याने सिंहगड, शिक्रापूर, शिरूर, कोंढवा परिसरात घरफोडीसह दुचाकी चोरीचे आठ गुन्हे केल्याची कबुली दिली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, सुजीत पवार, संजीव कळंबे, प्रताप पडवळ आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader