पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी करणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. तौसिफ बशीर शेख (वय २५, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. शेखने कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे तीन, तसेच सिंहगड रस्ता परिसरात एक गु्न्हा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराइतांची झाडाझडती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> प्रवासी तरुणीशी अश्लील कृत्य करणारा रिक्षाचालक गजाआड

फरार आरोपी, तसेच बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक गस्त घालत होते. त्यावेळी घरफोडीच्या गुन्ह्यात पसार असलेला चोरटा शेख कासेवाडी भागात थांबल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, रवींद्र लाेखंडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याने घरफोडीचे चार गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक शाहीद शेख, बाळू गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, इरफान पठाण, साईकुमार कारके यांनी ही कारवाई केली.