आठ गुन्हे उघड

दुकानांचा दरवाजा उचकटून चोरी करणाऱ्या चोरट्यांना कोंढवा पोलिसांकडून अटक करण्यात आली. चोरट्यांकडून आठ गुन्हे उघडकीस आले असून रोकड, दुचाकी, तांब्याची तार, चोरलेल्या दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अभिजीत विष्णू गांगुर्डे (वय २४, रा. रामटेकडी, हडपसर), शाहिद मोहम्मद उमर शेख (वय १८, रा. आल्हाट वस्ती, हडपसर) , रोहन रवी पंडीत (वय २३, रा. शांतीनगर, वानवडी) यांना अटक करण्यात आली. चोरट्यांबरोबर गुन्हे करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले.
कोंढवा भागात मध्यरात्री दुकानांचा दरवाजा उचकटून चोरी करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. पिसोळी भागातील एका इलेक्ट्रिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानाचा दरवाजा उचकटून चोरी करण्यात आली होती. अभिजीत गांगुर्डेने चोरी केल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर गांगुर्डेला अटक करण्यात आली. चौकशीत साथीदार शेख, पंडीत तसेच अल्पवयीन मुलांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

चोरट्यांनी दुकानांचा दरवाजा उचकटून चार गुन्हे, लूटमारीचे दोन तसेच दुचाकी चोरीचे दोन असे आठ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक जगन्नाथ जानकर, संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, असगरअली सैय्यद, गणेश चिंचकर, अमोल हिरवे, दीपक जडे, अभिजीत रत्नपारखी आदींनी ही कारवाई केली.

दरम्यान, पोलिसांना दुचाकी चोरी प्रकरणात एका चोरट्यास अटक केली. असिम मुस्ताक तांबोळी (वय २४, रा. भागोदयनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली.

Story img Loader