पुणे : कौटुंबिक वादातून पतीपासून वेगळे होत सोलापूर येथे विभक्त राहत असलेल्या पत्नीने माहेरच्या व्यक्तींसह पतीच्या घरी येऊन त्याच्या घराचे कुलूप तोडून घरात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यानंतर घरातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप आणि मोबाईल चोरून नेला. इतकेच नव्हे तर, पतीचे वापरातील कपडे घरात जाळून टाकणाऱ्या पत्नीविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी रेणुका कांबळे ऊर्फ रेणुका सिद्धाप्पा सन्नाके (वय ३२), जनाबाई सिद्धप्पा सन्नाके (वय ६०), सुरेश सिद्धप्पा सन्नाके, आकाश सिद्धप्पा सन्नाके ( सर्व रा. कोनापुरे रेल्वे लाईन, रघुजी क्लिनिक जवळ,सोलापूर) या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अनय सूर्यकांत कांबळे (वय ३७, रा. वाडेफाटा, ता. हवेली, जि. पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा >>>बंडखोर नाना काटेंची अजित पवारांनी घेतली भेट; महायुतीमधील बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनय आणि रेणुका यांचे २०१४ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर आणि रेणुका सासरी राहत असताना तिचे पतीसोबत कौटुंबिक कारणावरून वाद होत होते. त्यामुळे ती पतीस काही न सांगता मुलांसह माहेरी सोलापूर येथे सातत्याने निघून जात होती. २०२२ मध्ये तक्रारदार यांच्या पत्नीने त्यांच्या विरोधात सोलापूर येथील कौटुंबिक न्यायालय येथे पोटगी आणि कौटुंबिक हिंसाचार अधिनियम अन्वये दावा दाखल केला होता. त्याची सुनावणी अद्याप सुरू आहे. असे असताना मात्र पत्नीने सासरच्या व्यक्तींसह पतीच्या वाडेफाटा येथील घरी येऊन घराचे कुलूप तोडून बेकादेशीर प्रवेश केला. घरातील मुद्देमाल चोरी करून पतीचे वापरातील कपडे जाळले आहेत.

हेही वाचा >>>दिवाळीत अग्निशमन दलाकडून जनजागृती मोहिम; सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

घराचे कुलूप उघडून चार लाखांची चोरी

पुण्यातील महर्षीनगर परिसरात शत्रुंजय विहार सोसायटी येथे राहणाऱ्या संजय रूपचंद गोंदे (वय ६१) यांच्या घराचे कुलूप बनावट किल्लीने उघडून अज्ञात चोरट्याने घरातील चार लाख रुपयांच्या ऐवजाची चोरी केली. गोंदे यांची सदनिका कुलूप लावून बंद होती. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या समतीशिवाय बनावट किल्लीच्या सहाय्याने घराचा दरवाजा उघडला. घरातील लोखंडी कपाट उचकटून त्यामध्ये ठेवलेली रोकड, सोन्याचे दागिने आणि चांदीची नाणी असा चार लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस पुढील तपास करत आहेत.