पुणे : लष्करातील हवालदाराच्या घरातून २१ तोळे दागिने चोरून पसार झालेल्या जवानाला वानवडी पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी लष्करात जवान होता. मात्र, सेवा कालावधी पूर्ण न करता तो लष्करातून पसार (भगोडा) झाला होता. आरोपीने दिल्ली, तसेच हिमाचल प्रदेशात विक्री केलेले १६ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

अमरजीत विनोदकुमार शर्मा (वय ३०, रा. बघेल, ता. बदसर, जि. हमिरपूर, हिमाचल प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वानवडी परिसरात राहणारे लष्करातील जवान के. एम. वादीवेल्लू (वय ३५) यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. आरोपी शर्मा याने घराचे कुलूप तोडून कपाटातील २१ तोळे साेन्याचे दागिने चोरून नेले होते. घरफोडी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर हवालदार वादीवेल्लू यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. शर्मा घरफोडी करुन पसार झाला होता.

याप्रकरणाचा तपास वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने, उपनिरीक्षक धनाजी टोणे यांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, शर्माला सातारा परिसरातून अटक करण्यात आली, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी दिली.

घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. वानवडी, लष्कर, गोळीबार मैदान चौक, मंगळवार पेठ, खडकी, बंडगार्डन, विमाननगर, पुणे रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. पोलिसांनी तपसासाठी ५० ठिकाणचे चित्रीकरण ताब्यात घेतले होते. चित्रीकरण, तसेच तांत्रिक तपासात आरोपी शर्माने घरफोडी केल्याची माहिती मिळाली. तो उत्तर प्रदेश, अंबाला, जोधपूर, हिमाचल प्रदेश, दिल्लीत वास्तव्यास होता. त्यानतर तो बंगळुरूत गेल्याची माहिती मिळाली. बंगळुरूतून ताे बेळगावकडे बसमधून रवाना झाला. त्यानंतर पोलिसांचे पथक बेळगावला पाेहोचले. बेळगावमधून तो बसने साताऱ्याकडे गेल्याची माहिती मिळाली. त्यनंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला.

साताऱ्याजवळ ३० मार्च रोजी पहाटे पोलिसांच्या पथकाने बसमधून शर्माला ताब्यात घेतले. त्याला अटक करून वानवडीतील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तपासासाठी त्याला दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात नेण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून १६ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.

पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

लष्करी जवानाच्या घरातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणल्याने लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक केले. पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गोंविंद जाधव, उपनिरीक्षक धनाजी टोणे आणि पथकाने ही कामगिरी केली.

ऑनलाइन जुगाराचा नाद

लष्करातून पसार झालेला आरोपी जवान अमरजीत शर्मा याला ऑनलाइन जुगार खेळण्याचा नाद होता. जुगार खेळण्यासाठी त्याने घरफोडीचा गुन्ह केल्याचे तपासात उघडकीस आली आहे. त्याने आणखी काही गुन्हे केल्याचा संशय असून, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.