शहरात घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. शहर, तसेच उपनगरांत दररोज किमान एक ते दोन घरफोडीच्या घटना घडतात. काही वेळा एकाच सोसायटीतील चार ते पाच सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरीला जातो. घरफोडीचे गुन्हे, तसेच गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण विचारात घेता प्रत्येक घरफोडीचा छडा लागतोच, असे नव्हे. किमान शेजाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध ठेवले, तरी घरफोडीच्या घटनांना आळा घालणे शक्य होईल. सदनिकेची किल्ली पादत्राणांच्या जाळीत (शू रॅक) ठेवण्यात येते. चोर आता एवढे हुशार झाले आहेत, की त्यांना किल्ली कोठे ठेवली आहे, याची माहिती असते. कष्टाने कमावलेला लाखमोलाचा ऐवज चोरीला जातो. अशा घटनांकडे हताशपणे पाहण्यापेक्षा प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे आहे.
पुणे शहर, उपनगरात नोव्हेंबरअखेरपर्यंत घरफोडीच्या २५० हून जास्त घटना घडल्या. भरदिवसा यात सोसायटीत शिरून सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. शहराच्या मध्य भागाच्या तुलनेत उपनगरात हे प्रमाण जास्त आहे आणि ते वाढत आहे. वाघोली, कोंढवा, केसनंद, बाणेर, पाषाण, सूस, कात्रज, आंबेगाव, नऱ्हे, हडपसर, कोंढवा, कोथरूड, वारजे भागातील सोसायट्यांमधील सदनिकांचे कुलूप तोडून चोरांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरला आहे. उपनगरातील घरफोड्यांचे प्रमाण विचारात घेऊन पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या सोसायट्यांत बैठक घेऊन सूचनाही दिल्या आहेत. सोसायटी आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, रखवालदार ठेवावा, तसेच बाहेरील व्यक्तीला, फेरीवाल्याला सोसायटीत प्रवेश देऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, पोलिसांच्या सूचनांकडे अनेकांकडून कानाडाेळा करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा : हिंजवडी आयटी पार्कची कोंडी : उद्योगमंत्री उदय सामंत ‘ॲक्शन मोड’वर; अधिकाऱ्यांना दिले आदेश
अनेक जण कामानिमित्त सदनिका बंद करून बाहेर पडतात. घरकामास आलेल्या महिला, तसेच शाळेतून मुले आल्यास त्यांच्याकडे किल्ली नसते. त्यामुळे काही जण सदनिकेच्या बाहेर ठेवलेल्या पादत्राणांच्या जाळीत (शू रॅक) वा कुंडीत किल्ली ठेवतात. चोर नेमकी संधी साधून या किल्लीचा वापर करून सदनिकेत शिरतात. किल्ली मिळाल्यानंतर कडी-कोयंडा उचकटण्याची तसदीही चोरांना घ्यावी लागत नाही. कडी-कोयंडा उचकटताना आवाज झाल्यास पकडले जाण्याची भीती असते. किल्ली मिळवून सदनिकेत वा बंगल्यात शिरले, की काही क्षणांत लाखमोलांचा ऐवज चोरून चोर पसार होतात. अशा प्रकारच्या तीन घटना महिनाभरात घडल्या आहेत. कोथरूड, स्वारगेट, तसेच कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हेही दाखल झाले आहेत. अशा घटनांचा विचार केल्यास चूक कोणाची, हा प्रश्नही उपस्थित होतो. शेवटी ज्याचा ऐवज चोरीला जातो, त्या व्यक्तीकडे हळहळ करण्याशिवाय दुसरा मार्गही उरत नाही.
तत्कालीन पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी घरफोडीच्या घटना का होतात, याचा बारकाईने अभ्यास केला होता. बांधकाम व्यावसायिकांकडून सदनिकेला बसविण्यात आलेले कडी-कोयंडे तकलादू असतात. बाजारात चांगल्या दर्जाच्या पोलादापासून बनलेले कडी-कोयंडे आणि कुलूप उपलब्ध असते. लाखमोलाच्या ऐवजाची सुरक्षा तकलादू कडी-कोयंडे, कुलपांवर सोपवून चालणार नाही, हे त्यांनी जाणले होते. कटावणीच्या एका फटक्यात साध्या दर्जाचे कडी-कोयंडे आणि कुलूप तुटते. त्यामुळे त्यांनी चांगल्या दर्जाच्या पोलादापासून तयार केलेले कडी-कोयंडे आणि कुलूप वापरण्याची सूचना केली होती.
हेही वाचा : दुसरे विश्व मराठी संमेलन फेब्रुवारीच्या अखेरीस पुण्यात; ‘कवितांचे गाव’ साकारण्याची शक्यता
सुमारे २५ वर्षांपूर्वी पुणे शहरात ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ ही योजना सुरू करण्यात आली होती. घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी किमान शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा, अशी सूचना पोलिसांनी केली होती. आज शहर वाढत असताना आणि नोकरदार वर्गाचे कामाचे व्याप वाढत असताना, दिवसभर कामातच जात असल्याने एखाद्या घरातील कुटुंबाला शेजाऱ्यांशी संबंध ठेवण्याची गरज वाटत नाही आणि तेवढा वेळही मिळत नाही. पण, दुसरीकडे शहराचा विस्तार पाहता, प्रत्येक सोसायटी, चौकात पोलीस नियुक्त करणे शक्य नाही. त्यामुळे घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर सोसायटीत असते. रखवालदार असतो. मात्र, ही सुरक्षा भेदून चोर चोरी करताे. त्यामुळे ‘आपला शेजारी हाच खरा पहारेकरी’ ही योजना पुन्हा सुरू करण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.
rahul.khaladkar@expressindia.com