खराडी, कल्याणी, हिंजवडी आणि चिंचवड येथील उच्चभ्रू सोसायटय़ांतील सहा सदनिका चोरटय़ांनी शनिवारी फोडल्याचे उघडकीस आले आहे. या घरफोडीमध्ये आठ लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. या उच्चभ्रू सोसायटय़ांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.
खराडी येथील देव एक्झॉटिका या उच्चभ्रू सोसायटीत १२५ सदनिका आहेत. चोरटय़ांनी शनिवारी दुपारी तीन ते सहा दरम्यान या सोसायटीतील सहाव्या मजल्यावर राहणारे स्वप्निल जाजू, निखिल संचेती, रितेश विकास यालकर यांच्या सदनिका फोडल्या. रोक रक्कम, सोन्याचे दागिने असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. फक्त प्रवेशद्वारावरच सुरक्षारक्षक असून सोसायटीची संरक्षक िभतीची उंची कमी असल्यामुळे चोरटे सहज आत येऊ शकतात, अशी माहिती येरवडा पोलिसांनी दिली.
कल्याणीनगर येथील मार्श सोसायटीतील अब्दुल मजीद खेतसी (वय ६५) याच्या सदनिकेचे बनावट चावीने कुलूप उघडून शनिवारी दुपारी चोरटय़ांनी आत प्रवेश केला. कपाटातील रोख रक्कम पंधरा हजार आणि सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे आढळून आले आहे. त्याच बरोबर चिंचवड येथील विशाल हाइट्स येथील संदीप रमेश कचाटे (वय ३३) यांची सदनिका बंद असताना कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील एक लाख ४८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
थेरगाव येथील साई पार्क सोसायटीतील हरिराम भंवरलाल कुमावत (वय ३९) यांची सदनिका बंद असताना चोरटय़ांनी शनिवारी दुपारी घराचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एक लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी िहजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक एस. ए. जाधव हे अधिक तपास करत आहेत.

Story img Loader