माॅडेल काॅलनी भागात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील चार लाख ६४ हजारांचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत निकिता कोद्रे (वय ४२, रा. जानकी अपार्टमेंट, माॅडेल काॅलनी, शिवाजीनगर) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काेद्रे सदनिका बंद करुन दुपारी पावणेबाराच्या सुमारास बाहेर पडल्या.
चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाट उचकटले. कपाटातील ५०० रुपयांची रोकड आणि चार लाख ६४ हजार रुपयांचे दागिने असा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. कोद्रे दुपारी दोनच्या सुमारास घरी परतल्या. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तपास करत आहेत.