कासारवाडीत भुरटय़ा चोरांचा सुळसुळाट झाला असून गेल्या दीड महिन्यात नाशिक फाटय़ालगत एकाच भागात आठ वेळा घरफोडय़ा झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. यातील काही गुन्ह्य़ातील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. फुटेज देऊनही त्यांचा माग काढण्यात भोसरी पोलिसांना अपयश येत आहे. आतापर्यंत डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासाचे कारण देणारे पोलीस आता गणेशोत्सव बंदोबस्तात असल्याचे सांगून वेळकाढूपणा करत आहेत, असा नागरिकांचा आरोप आहे.
दीड महिन्यापूर्वी जितेंद्र लांडगे यांच्या घरी दिवसाढवळ्या चोरी झाली, त्यात तब्बल ७० तोळे सोने व दोन लाखांची रक्कम चोरीला गेली. आरोपी घरात जाताना आणि बाहेर पडल्यानंतर मोबाइलवर बोलताना दिसतात. फुटेज देऊन दीड महिने झाले, तरी अद्याप पोलिसांना सीसीटीव्हीतील आरोपींपर्यंत पोहोचता आलेले नाही. तपास सुरू असल्याचे मोघम उत्तर भोसरी पोलिसांकडून देण्यात येते. यानंतर दोनच दिवसांत शेजारच्या गंगोत्री हॉटेलमध्ये ५० हजारांची रोख रक्कम चोरीला गेली. नंतर, सागर प्लाझा सोसायटीतील गणेश मंदिराची दानपेटीच गायब झाली. शंकरवाडी मंदिरातही चोरी झाली. मॉडर्न कार डेकोरेटर येथून लाखोंचा ऐवज लंपास झाला. रविवारी पूना कार डेकोरेटर येथील अडीच लाख रुपये चोरीला गेले. चोरटय़ांनी जाताना सीसीटीव्ही कॅमेरेही गायब केले. धर्मवीर संभाजी बँकेशेजारील कौसल्या कॉर्नर येथे पूना गॅसमधून दीड लाखांचा माल व काही रोख रक्कम चोरीला गेली. राजू कार गॅरेज फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ते उघडले गेले नाही. या घटनेतील दोन आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सोमवारी सकाळी याच रस्त्यावर लावलेली इनोव्हा गाडी फोडण्यात आली. या सगळ्या घटना नाशिक फाटा परिसरात अध्र्या किलोमीटरच्या अंतरात घडल्या आहेत. त्यातील दोन घटनांमधील आरोपींचे फुटेज नागरिकांनी दिले. मात्र, पोलिसांना आरोपींचा शोध लागला नाही.
कासारवाडीत एकाच ठिकाणी नऊ घरफोडय़ा; भुरटय़ा चोरांचा सुळसुळाट
आरोपी घरात जाताना आणि बाहेर पडल्यानंतर मोबाइलवर बोलताना दिसतात. फुटेज देऊन दीड महिने झाले, तरी अद्याप पोलिसांना सीसीटीव्हीतील आरोपींपर्यंत पोहोचता आलेले नाही.
First published on: 10-09-2013 at 02:29 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burglary in kasarwadi