पुणे : नववर्षाच्या सुरुवातीला शहरात घरफोड्यांचे सत्र कायम आहे. कोथरूडमध्ये व्यावसायिकाच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने, रोकड असा ४१ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. सिंहगड रस्ता भागातही सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी २३ लाख ५३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.

याबाबत चंद्रशेखर केसरीनाथ चौधरी (वय ७९) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यावसायिकाची वाहनांना लागणारे दिवे तयार करण्याची कंपनी होती. टाळेबंदीत त्यांनी ही कंपनी बंद केली. कोथरूड भागातील रामबाग काॅलनीत शिवसाई केसरी अपार्टमेंटमध्ये ते राहायला आहेत. चौधरी कुटुंबीयांच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३२ लाख रुपये, पाच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, सात लाख १० हजारांचे हिरेजडीत दागिने तसेच दोन लाखांची रोकड असा ४१ लाख १६ हजार ७९८ रुपयांचा ऐवज लांबविला.

(हेही वाचा – नवीन मराठी शाळा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात, विविध प्रकल्पांसह शाळेचा १२५ वर्षांचा इतिहास प्रकाशित करण्याचे नियोजन)

सदनिकेतून ऐवज चोरीला गेल्यानंतर व्यावसायिकाने नुकतीच फिर्याद दिली. चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सिंहगड रस्ता भागातील धायरीत एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड असा २३ लाख ५३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत आशिष अंकुश पासलकर (वय ३३, रा. पार्थ संकुल, गणेशनगर, धायरी) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पासलकर यांचे पार्थ संकुल सोसायटीत रो हाऊस आहे. चोरट्यांनी दरवाज्याचे कुलूप तोडले. कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड असा २३ लाख ५३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम या प्रकरणाचा तपास करत आहेत.