पुणे : जंगली महाराज रस्ता परिसरातील रेव्हेन्यू काॅलनीत सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी अडीच लाखांचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि कुटुंबीय रेव्हेन्यू काॅलनीतील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांचे मूळ गाव शिरुर तालुक्यात आहे. सोमवारी ते मुळगावी गेले हाेते. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील दोन सोन्याच्या बांगड्या चोरुन नेल्या. सायंकाळी ते गावाहून परतले. तेव्हा सदनिकेचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी कपाटातील पाच तोळ्यांच्या बांगड्या चोरुन नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पाेलीस उपनिरीक्षक अजित बडे तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, कोंढवा भागात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील एक लाख ९३ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कोंढव्यातील इनामनगर परिसरात राहायला आहेत. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्या घर बंद करुन खरेदीसाठी बाहेर पडल्या होत्या. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाट उचकटून एक लाख ९३ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरुन चोरटे पसार झाले. तासाभरानंतर महिला खरेदी करुन घरी परतले. तेव्हा कुलूप तुटल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करत आहेत.शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कोथरुडमधील मयूर काॅलनीत एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burglary in revenue colony on jangli maharaj road pune print news rbk 25 amy