गरीब व मध्यमवर्गीय व्यक्तीने दैनंदिन गरजा भागवून बचत करून ठेवलेल्या बचतीवरच चोरटे डल्ला मारताना दिसत आहेत. गेल्या वर्षभरात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून घरफोडीच्या घटनांमध्ये चोरटय़ांनी तब्बल २३ कोटींचा ऐवज पळविल्याचे समोर आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात वर्षभरात तब्बल १३६४ घरफोडय़ा झाल्या असून दिवसाला साधारण चार घरफोडय़ा होताना दिसत आहेत. घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण देखील खूप अत्यल्प असल्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती लुटली जात आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा वेगाने विकास-विस्तार होत आहे. उपनगरे देखील झपाटय़ाने वाढत आहेत. शहरात अलिकडे शरीराच्या विरोधातील गुन्ह्य़ांबरोबरच मालमत्तेच्या विरोधातील गुन्ह्य़ात मोठी वाढ होताना दिसत आहे. शहरात सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांबरोबरच घरफोडीचे गुन्हे देखील वाढत असल्याचे दिसत आहेत. घरफोडीचा गुन्हा हा सर्वसामान्य नागरिकांशी निगडित आहे. गेल्या वर्षी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये तब्बल १३६४ घरफोडय़ा घडल्या आहेत. या मध्ये चोरटय़ांनी तब्बल २३ कोटी ६७ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. मात्र, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना अपयश आले आहे. तेराशेपैकी फक्त साडेचारशे घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या असून त्यामध्ये २ कोटी ४६ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या वर्षी पहिल्या दोन महिन्यांतच जवळजवळ अडीचशे घरफोडीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये दोन कोटी ८० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शहरात उपनगराच्या भागात घरफोडय़ा होण्याचे प्रमाण अधिक असले तरी अलिकडे मध्यवस्तीमधील विश्रामबाग, फरासखाना, खडक, डेक्कन या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे वाढले आहेत. तसेच, कोथरूड, वारजे, सांगवी, मुंढवा, पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड, सहकारनगर, कोंढवा, विमानतळ, येरवडा या पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत.
याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की पुण्यामध्ये फ्लॅट संस्कृती असल्यामुळे शेजारच्या घरात कोण राहतो याची देखील कल्पना नसते. त्याचाच फायदा चोरटे घेतात. चोरटे हे सहसा बंद सदनिका हेरून त्या फोडतात. शहरात दिवसा घरफोडय़ाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे सदनिका बंद करून जाताना शेजारच्या व्यक्तीला त्याची कल्पना द्यावी. आपला शेजारी हाच खरा पहारेकरी असतो. वडगाव शेरी व पिंपरीमध्ये घरफोडी करणारे चोरटे पकडून दिल्याचे समोर आले आहे. घरफोडीच्या घटना रोखण्यात पोलीस कमी पडत असले, तरी नागरिक देखील घराची पुरेशी काळजी घेताना दिसत नाहीत. चोरटे दरवाजाचा कडी-कोयंडा कटावणीच्या साहाय्याने उचकटून सदनिकेत प्रवेश करतात. त्यामुळे सोसायटय़ांमध्ये सीसीटीव्ही कॅमरे व सुरक्षारक्षक ठेवण्याच्या सूचना पोलिसांकडून केल्या जातात. पण, अनेक वेळा नागरिकांकडून त्याचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा