पुणे : दिवाळीत चोरटय़ांनी धुमाकूळ घातला असून, अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. दिवाळीच्या सुटीत बाहेरगावी गेल्यावर काही जण समाजमाध्यमांवर छायाचित्रे प्रसारित करत असून, ते पाहून बंद असलेल्या सदनिका फोडून ऐवज चोरण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाजमाध्यमांवर छायाचित्रे प्रसारित करताना खबरदारी घ्यावी, परगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळीत अनेक जण मूळगावी; तसेच पर्यटनासाठी जातात. बाहेरगावी गेल्यानंतर काही जण समाजमाध्यमावर छायाचित्रे प्रसारित करतात. चोरटे समाजमाध्यमातील छायाचित्रे पाहून बंद असलेल्या सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज लांबवितात. त्यामुळे परगावी जाताना नागरिकांनी शेजाऱ्यांना माहिती देणे गरजेचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, दिवाळीमध्ये चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. धनत्रयोदशीच्या पूजेसाठी देवघरात ठेवलेले सात लाख ९३ हजारांचे सोन्याचे दागिने चोरटय़ांनी लांबविल्याची घटना कर्वेनगर भागातील एका सोसायटीत घडली. याबाबत गौरांग होनराव (वय ३० रा. आदित्य बंगला, पुणे विद्यापीठ सोसायटी, कर्वेनगर) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. होनराव यांनी धनत्रयोदशीच्या पूजेसाठी बँकेच्या लॉकरमधून दागिने घरी आणले होते. शनिवारी (२२ ऑक्टोबर) होनराव यांनी देवघरात पूजेसाठी दागिने मांडले होते. विधिवत पूजन केल्यानंतर होनराव कुटुंबीय रात्री झोपले. स्वयंपाकघरातील मागील बाजूचा दरवाजा उघडा होता. दरवाजा बंद करण्यास होनराव विसरले. बंगल्यात शिरलेल्या चोरटय़ांनी देवघरातून सात लाख ९३ हजार रुपयांचे दागिने लांबविले. पूजेसाठी ठेवलेले दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पारवे तपास करत आहेत. चोरटय़ांनी होनराव यांच्या बंगल्यातून २२६ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच ५० ग्रॅम चांदीचे दागिने लांबविले. पोलिसांकडून पसार झालेल्या चोरटय़ांच्या शोध घेण्यात येत असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

हडपसर भागातील दुकानातून ४० मोबाइल चोरीस

धनत्रयोदशीच्या दिवशी हडपसर भागातील एका मोबाइल विक्री दुकानातील खिडकी उचकटून चोरटय़ांनी सात लाख १८ हजार ३७८ रुपयांचे ४० मोबाइल संच लांबविले. याबाबत स्वप्नील परमाळे (वय ३४, रा. उरळी देवाची, सासवड रस्ता) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. परमाळे यांचे हडपसर भागातील हांडेवाडी परिसरात न्यू साई मोबाइल दुकान आहे. चोरटय़ांनी मोबाइल दुकानाच्या दरवाज्याजवळ असलेली खिडकी उचकटून आत प्रवेश केला. दुकानात ठेवलेले ४० मोबाइल संच लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burglary seeing pictures on social media thieves thefts crime police ysh