शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळील असलेला कचरा जाळण्याच्या प्रकारांमुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होत आहे. या प्रकारामुळे वीजयंत्रणेवर परिणाम होत असल्याने वीजयंत्रणांजवळ कचरा साठणार नाही, याची नागरिकांनी काळजी घेऊन धोका टाळावा, असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.
गेल्या आठवडय़ात आंबेगाव पठारमध्ये महावितरणचे रोहित्र व फिडर पिलरजवळ कचरा जाळल्याने वीजयंत्रणेला आग लागली होती. अग्निशामक दलाने ही आग वेळीच अटोक्यात आणल्याने संभाव्य धोका टळला. मात्र, असे प्रकार सातत्याने होत असल्याचे लक्षात येत आहे. शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्युशन बॉक्स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील उघडय़ावर असलेल्या जागेत घरातील कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. महावितरणकडून सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या, कुंपण लावलेले आहे. मात्र, अनेक ठिकाणी कुंपणाच्या आतमध्ये कचरा टाकण्यात येतो.
कचऱ्यात असलेल्या खाद्यपदार्थामुळे छोटे प्राणी तेथे येतात व वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर वीजपुरवठा खंडित होतो किंवा प्राण्याचा नाहक जीवही जातो. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांसह वीजयंत्रणेपासून सावध व सतर्क राहावे तसेच वीजयंत्रणेच्या परिसरात किंवा कुंपणात ओला व सुका कचरा टाकण्याचे टाळावे.
वीजयंत्रणेजवळ साठवलेला कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणांमुळे कचरा जळाल्याने जवळच असलेल्या विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यायाने संबंधित परिसरातील वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. नागरिकांनी उघडय़ावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीजयंत्रणेला आग लागल्याचे किंवा संभाव्य धोका असल्याचे दिसताच टोल फ्री असलेल्या १८००२००३४३५ किंवा १८००२३३३४३५ तसेच १९१२ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Story img Loader