पुणे : भिवंडीतील भाविकांना दर्शनासाठी घेऊन निघालेल्या भाविकांच्या बसला बुधवारी सकाळी अचानक आग लागली. घोडेगाव- भीमाशंकर रस्त्यावरील शिंदेवाडी परिसरात ही घटना घडली. बसमधील प्रवासी आणि चालक तत्परतेने बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. आगीत प्रवाशांचे साहित्य; तसेच बस भस्मसात झाली. ठाणे जिल्ह्यामधील भिवंडी परिसरातील पाया गावातील २७ भाविक दर्शनासाठी भीमाशंकर येथे निघाले होते. बुधवारी (१२ ऑक्टोबर) सकाळी साडेसहाच्या सुमारास घोडेगाव ते भीमाशंकर रस्त्यावर शिंदेवाडीत भाविकांच्या बसने अचानक पेट घेतला. बसचालक बाबू बसप्पा सूरपूर (वय ३०, रा. कल्याण, सोनारपाडा, जि. ठाणे ) यांनी तत्परतेने प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. काही कळायच्या आत आग भडकली आणि बस पूर्णपणे जळाली.
हेही वाचा >>> पुणे : म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे आमिष ; ज्येष्ठ महिलेची १५ लाखांची फसवणूक
बसमधील प्रवासी चंद्रशेखर घोलप यांनी या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक फौजदार नवनाथ वायाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. बसमधील प्रवाशांचे साहित्य जळाले, असे सहायक फौजदार नवनाथ वायाळ यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?
बसला आग नेमकी कशी लागली, यामागचे निश्चित कारण शकले नाही. या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंभीर दुर्घटना टळली
नाशिक परिसरात बसला आग लागल्याची घटना ताजी असतानाच घोडेगाव परिसरात भिवंडीतील भाविकांच्या बसने अचानक पेट घेतला. बसचालकाने तत्परतेने प्रवाशांना खाली उतरवल्याने गंभीर दुर्घटना टळली. दैव बलवत्तर होते म्हणून बचावलाे, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.