पुणे : शहरातील वाहतुकीचा वेग वाढावा आणि वाहतूक कोंडीची समस्या सुटावी, म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘बस रॅपिड ट्रान्सपोर्ट’ (बीआरटी) अर्थात जलद वाहतूक योजनेचीच ‘कोंडी’ झाली असून, या योजनेची व्याप्ती शहरात आता काही रस्त्यांपुरतीच उरली आहे. ज्या ठिकाणी योजना सुरू आहे, तिथे ती केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र आहे.

येरवडा, नगर रस्ता, तसेच संगमवाडी परिसरात ‘बीआरटी’मुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन त्याचा त्रास वाहनचालकांना होत असल्याने या मार्गावरील बीआरटी महापालिकेने बंद करून टाकली आहे. तर, सातारा रस्ता, विश्रांतवाडी परिसरात बीआरटी मार्ग सध्या सुरू असून, त्यामधून पीएमपी बसबरोबरच खासगी वाहनेदेखील सर्रास ये-जा करीत आहेत.

गतिमान प्रवासासाठी २००६ मध्ये केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेच्या माध्यमातून बीआरटी प्रकल्प राबविण्यात आला. पुणे-सातारा रस्ता, हडपसर ते स्वारगेट आणि नगर रस्ता या तीन रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वांवर ही योजना सुरू करण्यात आली. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. जलद वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या या बीआरटी रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे सध्या दिसत आहे. या मार्गातून धावणाऱ्या बसचा वेग ताशी ३० किलोमीटर इतका गृहीत धरण्यात आला होता. मात्र, अनेक रस्त्यांवर बीआरटी मार्गच अस्तित्वात नसल्याचे वास्तव आहे. नगर रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी या रस्त्यावरील बीआरटी मार्ग कायमचा काढून टाकण्यात आला आहे. संगमवाडी येथील मार्गदेखील पोलिसांच्या सूचनेनंतर महापालिकेने काढून टाकला आहे.

सातारा रस्ता, तसेच विश्रांतवाडी परिसरातील रस्त्यांवर सध्या बीआरटी सुरू आहे. मात्र, त्यामध्ये घुसखोरी करून खासगी वाहने, दुचाकीचालकदेखील ये-जा करतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बीआरटीमधून बेकायदा पद्धतीने ये-जा करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे अनेकदा वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र आहे.

सात मार्गांवर ७२ किलोमीटरवर प्रयोग

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सात मार्गांवर ७२ किलोमीटरचा बीआरटी प्रकल्प राबविण्यात आला होता. पुणे शहरात तीन, तर पिंपरी-चिंचवडमध्ये चार मार्गांवर हा प्रकल्प राबविण्यात आला. त्यांपैकी ५० किलोमीटरचा मार्ग पिंपरी-चिंचवडमध्ये, तर २२ किलोमीटरचा मार्ग पुण्यात होता. मात्र, सध्या पुणे शहरातील बीआरटी मार्गाची अवस्था दयनीय आहे.

सातारा रस्ता, विश्रांतवाडी या रस्त्यांवरील बीआरटी मार्ग काढून टाकण्याबाबत कोणताही विचार सध्या नाही. वाकडेवाडी ते बोपोडी रस्त्यावर बीआरटी केली जाणार होती. मात्र, तेथेही आता हा प्रकल्प केला जाणार नाही. तसेच, सध्या नव्याने कोणत्याही रस्त्यावर बीआरटी प्रकल्प करण्याचे प्रस्तावित नाही.- अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख