पुणे : ‘बँकॉकला व्यावसायिक कामानिमित्त (बिझनेस ट्रिप) चाललो होतो,’ असा जबाब खासगी विमानाने मित्रांबरोबर बँकॉकला निघालेल्या माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुत्राने, ऋषिराज यांनी पोलीस चौकशीत दिला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने त्यांच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांचाही जबाब नोंदवून घेतला आहे.
ऋषिराज यांचे सोमवारी सायंकाळी अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. हे अपहरण नसून, ऋषिराज दोन मित्रांबरोबर खासगी विमानाने बँकॉकला जात असल्याचे स्पष्ट झाल्यावर विमान भारतीय हवाई हद्द सोडण्यापूर्वीच माघारी वळविण्यात आले होते. रात्री नऊच्या सुमारास ते पुणे विमानतळावर उतरले. त्यानंतर ऋषिराज यांच्यासह, बरोबर असलेल्या दोन मित्रांची पोलिसांनी चौकशी केली.
‘या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असून, तिघांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे,’ अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली. ‘आठवडाभरापूर्वी व्यावसायिक कामासाठी दुबईला गेले होते. त्यानंतर खासगी विमानाने ते मित्रांसमवेत व्यावसायिक कामासाठी बँकाँकला निघाले होते’, असे ऋषिराज यांनी जबाबात नमूद केले आहे. ‘आठवडाभरापूर्वीच दुबई दौरा झाल्याने लगेचच बँकाँकला खासगी विमानाने व्यवासायिक कामासाठी निघाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यास ते नकार देतील, या शक्यतेमुळे कुटुंबीयांना बँकाॅक दौऱ्याबाबत माहिती दिली नाही,’ असेही त्यांनी जबाबात नमूद केले आहे.
कथित अपहरण प्रकरणात पुढे काय?
‘ऋषिराज यांचे अपहरण झाल्याची फिर्याद सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन चौकशी करण्यात आली, तेव्हा हे प्रकरण अपहरण नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे संबंधित गुन्हा रद्दबातल करण्याची प्रक्रिया (समरी रिपोर्ट) पार पाडली जाऊ शकते. याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दाखल झालेला अपहरणाचा गुन्हा रद्दबातल केला जाईल,’ अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.