पुणे : शहरातील एका बड्या रद्दी व्यावसायिकाकडे ७० लाखांची खंडणी मागणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी व्यावसायिकाकडे कामगार होता. पगारावरून वाद झाल्याने त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. मालकाला धडा शिकविण्यासाठी त्याने खंडणी मागितल्याचे तपासात उघडकीस आले.
मितीन देवलाल सरोज (वय ३१, सध्या रा. लोहियानगर, गंज पेठ, मूळ रा. बभनपूर, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे अटक केेलेल्याचे नाव आहे. याबाबत एका व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदाराचा रद्दी व्यवसाय आहे. त्यांच्या मोबाइल क्रमांकावर अनोळखी क्रमांकावरून सरोजने संपर्क साधला होता. सरोजने त्यांच्याकडे ७० लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या व्यावसायिकाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. तपासात सरोजने पत्नीच्या मोबाइलवरून व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्याचे उघडकीस आले.
हेही वाचा >>>“मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा”, पुण्यातील शिवा
सरोज सोमवार पेठेतील किराणा माल दुकानात कामाला असल्याची माहिती पोलीस कर्मचारी शुभम देसाई यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस कर्मचारी शुभम देसाई, नीलेश साबळे, विठ्ठल साळुंखे यांनी ही कामगिरी केली.