पुणे : वाघोली परिसरात मंडप गोदामात आग लागून तीन कामगारांचा मृत्यू झाल्या प्रकरणी एका व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी व्यावसायिकाच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष सर्जित अग्रवाल (वय ४०, रा. बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. बिजेन पात्रा (वय २८), विश्वजित सेन (वय ३३), कमल ब्रार (वय २९, तिघे रा. मैथनीपूर, पश्चिम बंगाल) अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. वाघोलीतील उबाळेनगर भागात अग्रवाल यांचे शुभ्र सजावट साहित्य मंडप केंद्र आहे. त्यांचे गोदाम उबाळेनगर परिसरात आहे. ५ मे रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास गोदामात बारा कामगार जेवण करत होते. अचानक आग लागल्याने कामगार बाहेर पळाले. कामगार बिजेन पात्रा, विश्वास सेन आणि कमल गोदामात आग लागल्यानंतर अडकून पडले. आगीत होरपळून तिघांचा मृत्यू झाला होता.
अग्रवाल यांनी गोदामातील खोलीत कामगारांसाठी राहण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी अग्निशमन विभाग, विद्युत, बांधकाम विभाग तसेच पोलिसांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. कामगार राहत असलेल्या खोलीमध्ये सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नव्हत्या. अग्रवाल यांच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर त्यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे अधिक तपास करत आहेत.