लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: महापालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाकडून नऱ्हे, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द येथील २५ व्यावसायिक मिळकतींची तपासणी करण्यात आली. या तपासणीत रूफ टाॅप, साइड मार्जिन, फ्रंट मार्जिन असलेल्या मिळकती शोधून त्यांना नव्याने करआकारणी करण्यात आली. तसेच थकबाकी वसूल करण्याची कारवाईही करण्यात आली.

मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख आर्थिक स्रोत आहे. महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात दिलेल्या उद्दिष्टानुसार जास्त उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करआकारणी आणि करसंकलन विभागाचा आहे. त्यानुसार करआकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी तपासणी मोहीम राबविण्यात आली. तपासणी दरम्यान अनधिकृत बांधकाम असलेल्या मिळकती, रूफ टाॅप, साइड मार्जिन, फ्रंट मार्जिन असलेल्या मिळकती शोधण्यात आल्या. तसेच थकबाकी असलेल्या मिळकतींकडून धनादेश घेण्यात आले. काही मिळकतीही सील करण्यात आल्याची माहिती अजित देशमुख यांनी दिली.

हेही वाचा… VIDEO: MPSC उत्तीर्ण दर्शना पवारची हत्या करणारा राहुल हंडोरे कोण आहे? पोलीस म्हणाले, “सध्या तो…”

करआकारणी न झालेल्या मिळकतींची तपासणी करून हाॅटेल साइड मार्जिन, टेरेसचा वापर आणि अनधिकृत गोदाम, तसेच औद्योगिक मिळकतींच्या आकारणीची तपासणी करण्यात आली. काही मिळकतींना तीन पट मिळकतकराची आकारणी करण्यात आली. येत्या काही दिवसांत शहरात अशीच तपासणी करण्यात येणार असून, वाढीव बांधकाम, अनधिकृत वापर आणि आकारणी न झालेल्या मिळकतींना करआकारणी, थकबाकी वसुली ही मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे अजित देशमुख यांनी सांगितले.