माया परांजपे. सौंदर्यवर्धक उपचारांच्या संदर्भात हे सर्वाना परिचित असलेले मराठी नाव. ज्या काळी महाराष्ट्राला आणि त्यातही मध्यमवर्गाला ‘ब्यूटी पार्लर’ ही संज्ञाच खूप नवीन होती अशा वेळी त्यांनी परदेशातून शिकून येऊन ब्यूटी पार्लर आणि पार्लरशी संबंधित प्रशिक्षण वर्ग सुरू केले होते. मुंबईत एका बंगल्यात सुरू झालेल्या या छोटय़ा व्यवसायाचे पुढे सौंदर्यप्रसाधनांच्या कंपनीत रूपांतर होणार होते. ते पुण्यात घडले. ब्यूटी पार्लर्समध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या ‘ब्यूटिक’ या सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन पुण्यात पिरंगुटमध्ये होते.

ते साल असावे १९६८. मराठी घरांमध्येच काय, पण देशातच ‘ब्यूटी पार्लर’ ही संज्ञा फारशी पोहोचली नव्हती. मंडळींना ‘हेअर ड्रेसिंग’ माहीत असे. पण पार्लरमध्ये जाऊन सौंदर्यवर्धक उपचार करून घ्यायचे म्हणजे काय, हे ठाऊक नसे. माया परांजपे यांनी त्या वेळी स्वित्र्झलड आणि लंडनमध्ये शिकून येऊन मुंबईत एक लहान ब्यूटी पार्लर सुरू केले. पार्लर चालवताना त्यासाठी सौंदर्यप्रसाधने लागत आणि ती देशात फारशी बनत नव्हती. त्यामुळे जी थोडकी पार्लर्स चालायची तिथे आपल्याला लागणारी प्रसाधने परदेशातून मागवली जात. त्या वेळी आकारली जाणारी ३०० टक्के डय़ूटी भरून परदेशी उत्पादने आणणे म्हणजे उपचारांची किंमत त्या प्रमाणात वाढवणे. देशातच विविध सौंदर्यप्रसाधने बनू लागली तर फायदा होईल, हा विचार तिथे आला आणि परांजपे यांच्या ‘ब्यूटिक’ सौंदर्यप्रसाधनांची कल्पना रुजली.

परांजपे या स्वत: पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्राची पदवी घेतलेल्या, तर त्यांचे पती औषधनिर्माणशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र अशी दुहेरी पीएच.डी. पदवी संपादन केलेले. शिवाय माया यांना स्वित्र्झलडमध्ये जीनिव्हा लॅबोरेटरीत ‘बायोलॉजिकल ऑरगॅनिक केमिस्ट्री’ या विषयातील संशोधनाचाही अनुभव होता. आपणच सौंदर्यप्रसाधने बनवण्याचा प्रयत्न करूया, असे पतीने सुचवल्यानंतर माया यांनी आयुर्वेदिक पुस्तकांचा अभ्यास सुरू केला. गेली चाळीस वर्षे बाजारात चालणारी ‘नितल’, ‘कोमल’ ही सौंदर्यप्रसाधने त्यांच्या अशा काही पहिल्या उत्पादनांपैकी. १९६८ ते १९७६ या काळात मुंबईच्या बंगल्यातच पार्लर आणि घरीच उत्पादने बनवण्याची प्रयोगशाळा असे त्यांचे काम होते. या छोटय़ा प्रमाणातील उत्पादनाला व्यावसायिक म्हणावे असे रूप मात्र पुण्यात मिळाले.

नवीन कल्पना, मनुष्यबळ, जागा या सर्व गोष्टी उपलब्ध झाल्या, अन्न व औषध प्रशासनाचा सौंदर्यप्रसाधने आणि आयुर्वेदिक उत्पादने बनवण्याचा रीतसर परवानाही घेण्यात आला आणि सदाशिव पेठेत कै. वा. दि. वैद्य शाळेजवळील बंगल्यात सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन सुरू झाले. आधी त्यांच्या पार्लरमध्ये जे ग्राहक येत किंवा १९७३ पासून ज्या मुली ब्यूटी पार्लरचे काम शिकण्यासाठी येत त्यांच्यातच उत्पादनांची प्रामुख्याने विक्री होई. पुण्यातील उत्पादन चांगले सुरू झाल्यानंतर प्रसाधनांचा खप वाढवण्यासाठी अनुकूल स्थिती आली आणि मग ओळखीच्या लोकांकडे विक्रीसाठी पुरवठा करण्यास सुरुवात झाली. या मध्यंतरीच्या काळातही माया परांजपे बाहेरच्या देशात जाऊन नवीन सौंदर्योपचार शिकत होत्या. त्या जे जे नवीन शिकत त्यासाठी काहीतरी नवीन प्रसाधनांची गरज भासे. अशा रीतीने उत्पादने वाढत गेली. आता हा व्यवसाय ‘ब्यूटिक कॉस्मेटिक्स इंडिया प्रा. लि.’ झाला आहे. २००० पासून त्यांचा पिरंगुटचा कारखाना सुरू झाला. पुण्यात आणि मुंबईत दोन्ही ठिकाणी त्यांची प्रशिक्षण संस्था व पार्लर असली तरी प्रसाधनांच्या उत्पादनासाठी पुणेच चांगले वाटते, असे माया परांजपे सांगतात. पुण्यात दगदग तुलनेने कमी होते, असा साधा हिशेब आहे.

चाळीस वर्षांचा हा व्यवसाय परांजपे कुटुंबातच राहिला. आज माया परांजपे, त्यांचा मुलगा आणि सून तो सांभाळतात. गेली दहा वर्षे महाराष्ट्राबाहेरच्या बाजारपेठेत उतरण्याचाही प्रयत्न ते करत आहेत. प्रचंड स्पर्धेच्या काळातही त्यांच्या सौंदर्यवर्धक उत्पादनांची विशेष जाहिरात कुठे बघायला मिळत नाही. याचे कारण मुळातच त्यांनी स्वत:चा ग्राहक ठरवून घेतला आहे. बाजारात ही उत्पादने मिळत असली तरी त्यांचा सर्वाधिक खप पार्लर्समध्येच होतो. पार्लर चालवण्यामधील आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रशिक्षण व तिथले अभ्यासक्रम इथे प्रथम सुरू करणाऱ्या म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. काळानुसार पार्लर्स प्रचंड संख्येने वाढली आणि मध्यमवर्गही विस्तारला. कायम हा वर्ग आणि त्यांना सेवा देणारी पार्लर्स हाच ‘ब्यूटिक’चा मुख्य ग्राहक राहिला. बाजारातील सर्वोच्च श्रेणीचा ब्रँड बनण्याच्या फंदात ते कधी पडले नाहीत, पण त्याच वेळी आपला ग्राहक आणि दर्जा यांच्याशी प्रामाणिक राहून टिकून राहिले. हा एक प्रकारचा पुणेरी बाणा त्यांच्यात दिसतो. १९९५ पर्यंत सौंदर्यप्रसाधनांच्या व्यवसायात केवळ भारतीय कंपन्यांशीच त्यांना स्पर्धा करावी लागे. बरं, त्यात हा छोटा उद्योग. त्यानंतर मात्र बाजार खुला झाला आणि सौंदर्यप्रसाधनांमधील बडय़ा कंपन्या देशात आल्या. या कंपन्यांचे मार्केट प्रचंड मोठे आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादकांना त्यांची तगडी स्पर्धाही अपरिहार्य. या स्पर्धेत आपल्या छोटय़ा व्यवसायाचा आब राखणे हे आजच्या काळाचे मोठे आव्हान ‘ब्यूटिक’ने स्वीकारले आणि त्यात ते यशस्वीही झाले.

सौंदर्यप्रसाधन म्हटले की असंख्य प्रकार आणि त्यातही असंख्य कंपन्या, अशा काळातही पुण्यात बनणारी ही सौंदर्यप्रसाधने त्यांच्या ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. गेली चाळीस वर्षे हे उत्पादन पुण्यात केवळ अव्याहतपणे केवळ सुरूच राहिले नाही, तर त्यांनी नवनवीन उत्पादने आणत आपल्या कलाने व्यवसायवृद्धीकडे प्रवास केला.

sampada.sovani@expressindia.com