कर्नाटकचा आंबा ‘देवगड हापूस’ म्हणून विकून केली जाणारी ग्राहकांची फसवणूक, आंबा लवकर पिकवण्यासाठी केला जाणारा कॅल्शियम कार्बाइडचा वापर, या गोष्टी आता टाळता येणार आहेत. सिंधुदुर्गच्या ‘देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थे’ ने आंबा ऑनलाईन विकण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यात ग्राहकांना थेट आंबा उत्पादकांकडूनच आंबा मागवता येणार असल्याने त्यांना अस्सल आणि नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबा मिळेल, असे संस्थेचे अध्यक्ष अॅड. अजित गोगटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ही घरपोच सेवा सध्या केवळ पुणे आणि मुंबईच्याच ग्राहकांसाठी उपलब्ध असून ग्राहकांना किमान एक डझनाची ऑर्डर नोंदवावी लागणार आहे. आंब्याच्या ऑनलाईन विक्रीचा उपक्रम गेली दोन वर्षे संस्थेतर्फे चाचणी तत्त्वावर राबविण्यात आला असून या वर्षीपासून तो मोठय़ा प्रमाणावर राबविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. ६६६.ीि५ॠंेिंल्लॠ.ूे या संकेतस्थळावरून आंब्यासाठी ऑर्डर नोंदवता येणार आहे.
गोगटे म्हणाले, ‘‘ग्राहकांना ऑनलाईन आंबा ऑर्डर करताना २०० ग्रॅम वजनाच्या लहान आकाराच्या आंब्यापासून ३५० ग्रॅमपर्यंतच्या मोठय़ा आंब्यापर्यंत सहा श्रेणींमधील देवगड हापूससाठी मागणी नोंदवता येणार आहे. हा आंबा भाताच्या पेंढय़ात घालून नैसर्गिकरीत्या पिकवलेला आहे. मुंबईच्या वाशी बाजारात गुजरातमधील बलसाड आणि कर्नाटकचाही आंबा मोठय़ा प्रमाणावर येतो. कर्नाटकचे आंबा उत्पादन खूप जास्त असल्यामुळे काही ठिकाणी कर्नाटकचा आंबाच ग्राहकांना देवगड हापूस या नावाने विकला जातो. अस्सल देवगड हापूस तुलनेने महाग असला तरी त्याला वैशिष्टय़पूर्ण चव असते. ऑनलाईन आंबा उपक्रमात ग्राहकांना अस्सल आंबा मिळणे आणि आंबा शेतकऱ्यांना जादा दर मिळणे शक्य होणार आहे.’’
गेली चार वर्षे हवामान बदलामुळे देवगड आंब्याच्या पिकावर विपरीत परिणाम झाल्याचे गोगटे यांनी सांगितले. देवगडमध्ये हवामान चांगले असताना चाळीस ते पन्नास हजार टन हापूसचे उत्पादन होते. त्याच्या केवळ तीस ते पस्तीस टक्केच पीक या वर्षी आले आहे.  
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buy deogad alphanso now through online
Show comments