‘बीव्हीजी’ हे नाव महाराष्ट्राला माहिती आहे ते १०८ या दूरध्वनी क्रमांकाच्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवेमुळे. पण या एकाच क्षेत्रात बीव्हीजीचे काम आहे असे नाही. हा समूह अनेकविध क्षेत्रांमध्ये आणि सेवांपासून उत्पादनापर्यंत कार्यरत आहे. पुण्यातून सुरू झालेल्या या समूहाने देशासह परदेशातही आपल्या व्यवसायाचा विस्तार केला.
‘बीव्हीजी’ ही अक्षरे कुणा व्यक्तीच्या नावाची अद्याक्षरे वाटतात. पण त्याचे पूर्ण रूप आहे ‘भारत विकास ग्रुप’. देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या इमारतींच्या स्वच्छतेपासून ‘इमर्जन्सी’ सेवा पुरवण्यापर्यंत त्यांच्या व्यवसायाचा पट विस्तारला आहे. मूळच्या रहिमतपूरच्या हणमंत गायकवाड यांनी सुरू केलेला हा व्यवसाय पुण्यातून सुरू झाला आणि देशभर त्यांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही ते विविध प्रकारच्या सेवा पुरवत आहेत.
गायकवाड यांनी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी १९९१ मध्ये देशासाठी लहान का होईना, पण वेगळे काम करावे या उद्देशातून ‘भारत विकास प्रतिष्ठान’ ही संस्था सुरू केली. तेव्हा गायकवाड अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांला होते. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून ते १९९४ मध्ये ‘टेल्को’मध्ये नोकरीस लागले. त्या वेळी त्यांचा पगार होता वर्षांला एक लाख रुपये. पण कंपनीला ‘कॉस्ट सेव्हिंग’ करण्यासाठी ते उपाय सुचवत. जुन्या वायर्स पुन्हा वापरक्षम बनवून त्यांनी कंपनीचे जवळपास अडीच कोटी रुपये वाचवले. वरिष्ठांनी त्यांना कौतुकाने भेटायला बोलावले आणि तुला काय हवे, असे विचारले. गायकवाड मूळचे रहिमतपूरचे असल्यामुळे तिथली मुले नोकरीच्या शोधात असल्याचे त्यांना माहीत होते. त्यांच्यापैकी काहींना नोकरी मिळाली तर चांगले, असे उत्तर गायकवाड यांनी वरिष्ठांना दिले. तेव्हा कंपनीत ‘हेल्पर’चे काम नव्हते, पण ‘हाऊसकीपिंग’साठीचे काम होते. मग पुढच्या तीन वर्षांत रहिमतपूर आणि आसपासच्या गावांमधून आलेली तीनशे मुले तिथे नोकरीस लागली.
गायकवाड यांनी २००१ मध्ये नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ व्यवसाय करायचे ठरवले. सुरुवातीला त्यांनी स्वच्छता सेवांमध्येच उतरण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद या तीन शहरांमध्ये त्यांनी कामे सुरू केली. २००३ मध्ये संसदेच्या ग्रंथालयाची स्वच्छता करण्याच्या कामाची संधी त्यांना मिळाली. त्याच सुमाराला त्यांनी व्यवसायासाठी ‘भारत विकास ग्रुप’ (बीव्हीजी) या नावाने कंपनी स्थापन केली. हणमंत गायकवाड या समूहाचे संस्थापक, तर उमेश माने हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. हणमंत गायकवाड यांच्या पत्नी वैशाली आणि भाऊ दत्तात्रय हेही व्यवसायात मदत करतात. या कंपनीची सुरुवात जरी ‘हाऊसकीपिंग’ सेवांनी झाली असली तरी पुढे ग्राहकांकडून जशी मागणी होत गेली तशा ते वेगवेगळ्या सेवा पुरवत गेले. इलेक्ट्रिकल मेन्टेनन्स, वाहतूक अशा विविध सेवांमध्ये ते उतरू लागले. संसदेच्या ग्रंथालयानंतर खूप महत्त्वाच्या इमारतींच्या स्वच्छतेचे काम त्यांना मिळत गेले. पंतप्रधानांचे घर, त्यांचे कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय, अर्थ मंत्रालय, सफदरजंग रुग्णालय, एम्स रुग्णालय अशा विविध ठिकाणी त्यांनी स्वच्छता आणि देखभालीची कामे सुरू केली. मुंबई, नागपूर, चेन्नई, बंगळुरू या विमानतळांवरील स्वच्छतेची कामे ते करतात. अमृतसरच्या सुवर्णमंदिरासह शिर्डी, मुंबईतील सिद्धिविनायक अशा विविध प्रसिद्ध देवस्थानांच्या स्वच्छतेची कामेही त्यांना मिळाली आहेत.
अत्यावश्यक वैद्यकीय सेवा हे बीव्हीजीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणावे लागेल. आपल्याकडे राज्यात १०८ या दूरध्वनी क्रमांकावर ‘इमर्जन्सी’ रुग्णवाहिका बोलवता येते. गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारतर्फे सेवा दिल्या जाणाऱ्या या रुग्णवाहिकांचे काम बीव्हीजी पाहते. पुण्यातूनच औंधमधून या सेवेचे नियमन केले जाते. साधारणत: पाच महिन्यात ९५० रुग्णवाहिका त्यांनी सुरू केल्या. शहरांबरोबरच ग्रामीण भागातही काम करणाऱ्या या रुग्णवाहिकांनी १३ लाखांहून अधिक रुग्णांना मदत झाली असल्याचे हणमंत गायकवाड सांगतात. त्याबरोबर अत्यावश्यक पोलीस सेवांच्या क्षेत्रातही ते उतरले आहेत.
सेवा पुरवण्यासह बीव्हीजी उत्पादनातही काम करते. गेल्या एक वर्षांपासून ते एलईडी लाईट्सचे उत्पादन करतात. गोवा राज्यात दोन लाख दिवे बदलण्याचे काम बीव्हीजीला मिळाले आहे. शेती क्षेत्रात खर्च कमी करणे, शिवाय पीक उत्पादन आणि गुणवत्ता वाढवणे यातही ते गेली तीन वर्षे कार्यरत आहेत. वेगळ्या प्रकारची ‘हर्बल’ कीटकनाशके, जमिनीचा कस वाढवणारे घटक त्यांनी आणले आहेत. गाई-म्हशींचे दूध उत्पादन वाढवण्यासाठीची उत्पादने, भाकड गाई-म्हशींसाठीची उत्पादनेही त्यांनी बनवली आहेत, असे गायकवाड सांगतात. शेतीसाठीची ही उत्पादने कोल्हापूरला बनतात. साताऱ्यात शेतमालावर प्रक्रिया करणारे ‘मेगा फूड पार्क’ ते उभारत आहेत. बीव्हीजीचे मुख्यालय मात्र पुण्यातच आहे.
खूप वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करत असूनही ते सांभाळणे त्यांना अवघड वाटत नाही. प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळी तज्ज्ञ मंडळी नेमून त्यांना पुरेसे अधिकार व स्वातंत्र्य दिले जाते, असे गायकवाड सांगतात. केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही बीव्हीजी सेवा पुरवते. सध्या त्यांनी कंबोडियामध्ये ‘सोलर पार्क’चे काम घेतले आहे, तसेच तिथे ६० हजार हेक्टरवरील उसाचे उत्पादन व गुणवत्तावाढीसाठीच्या सेवा बीव्हीजी देत आहे. झिंबाब्वेमध्ये ते सोन्याच्या खाणींसंबंधी काम करतात, तर घानामध्येही शेतीविषयक कामे सुरू आहेत.
आपण व्यवसायातील स्पर्धा पाहातच नाही, आपण केलेल्या कामामुळे स्वत: समाधानी आहोत का, एवढेच महत्त्वाचे वाटते, असे गायकवाड आवर्जून नमूद करतात. पुण्याशी गायकवाड यांचे नाते जुने आहे. ते सहावीत शिकत असताना रहिमतपूरहून पुण्याला आले. सध्या बीव्हीजीमध्ये काम करणारी बहुसंख्य मंडळीही पुण्याचीच आहेत. हे शहर खूप चांगले आहे, पण पुण्याच्या पालिकेत कधी काम करण्याची संधी मिळाली नाही, असे ते मिस्किलपणे नमूद करतात.
sampada.sovani@expressindia.com