राज्यात परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकुळ घातला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यालाला तर काल मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपून काढलं. शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले, अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. झाडे, फांद्या आणि भिंती कोसळण्याच्या घटनाही घडल्या. रात्री घराबाहेर असलेले अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले. या पार्श्वभूमीवर आज(मंगळवार) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपावर जोरदार टीका केली. शिवाय शहाराच्या दुरावस्थेबाबत मनपाला जाबही विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

PHOTOS : आभाळ फाटलं!, पुणेकरांनी अनुभवला उरात धडकी भरवणारा पाऊस

अजित पवार म्हणाले, “स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला ‘अव्यवस्थेची’ कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील.”

PHOTOS : पुण्यात परतीच्या पावसाचं थैमान; श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातही शिरले पाणी

याशिवाय, “तूर्तास पुण्यातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करतंच आहोत. जनतेनं देखील आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करतो. सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती पाऊलं उचलून स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असून त्याचा आढावा आम्ही घेत आहोत.” असंही अजित पवार यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

पत्रकारपरिषदेत बोलताना “राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे तर जलमय करुन टाकले आहे. तर दुसरीकडे पुन्हा एका चक्रीवादळाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे जनतेला अलर्ट केले पाहिजे. शिवाय धरणाचे पाणी सोडत असताना नदीकाठच्या लोकांनाही सतर्क केले पाहिजे आणि या घटनांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे.” अशी मागणी केली.

याशिवाय, “पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांनी नद्यांचे स्वरूप आले आहे. वाहतुकीच्या समस्येकडेही अजिबात कोणीच बघायला तयार नाही. वाहतूककोंडीबाबत पोलिसांना विश्वासात घेण्याची गरज आहे. परंतु तसं होत नाही. कालतर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातही पाणी शिरलं. मंडळाच्या कार्यकर्त्यांचं रात्री उशीरापर्यंत पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहालयात देखील पाणी शिरलं. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. पुण्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. याकडे लक्ष द्यायला हवे ते लक्ष दिले जात नाही.” असा आरोपही अजित पवार यांनी केला.

हेही वाचा : “एहसान फरामोश” म्हणून तुमची ओळख…; बाळा नांदगावकरांचा संजय राऊतांवर पलटवार!

तर “पुण्यात बिल्डर किंवा महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांशी लागेबांधे असणाऱ्यांनी निसर्गाने पुर्वीच्या काळात तयार केलेले नैसर्गित स्त्रोत जसे की नद्या, ओढे, नाले इत्यादी ठिकाणी मोठ्याप्रमाणावर राडारोडा टाकून, बुजवून इमारती उभारल्या आहेत. मागे पुण्यातही हेच घडल्यानंतर त्यावेळी पालकमंत्री या नात्याने मी बैठक घेतली होती. त्यावेळी भाजपाचीच महापालिकेत सत्ता होती. मी त्यावेळी महापौर, आयुक्त आणि सगळ्या टीमला सांगतिलं होतं, की याच्यात राजकारण आणू नका. परंतु पुण्याच्या आजुबाजुला टेकड्यांचा डोंगराचा भाग आहे. तिथून ज्यावेळेस मोठ्याप्रमाणावर पाणी जोरात खाली येतं. ते पाणी ओढ्या, नाल्यांनी नदीपर्यंत मिळण्यासाठीचा जो मार्ग आहे, त्या मार्गावरील अतिक्रमणं ताबडतोब काढली पाहिजेत. त्यामध्ये कोणी बांधकाम केलेलं असेल तर ते तोडलं पाहिजे. काही ठिकाणी काहींनी मोठे नाले बुजवले आणि पाईप टाकले आहेत. त्या पाईपांचा आकार लहान असल्याने त्यामध्ये तेवढ्या प्रमाणावरील पाणी बसत नाही. मग पाणी मागे दाबलं जातं आणि ते नागरिकांच्या वसाहतीत शिरतं आणि त्यांचं नुकसान होतं.” असंही अजित पवारांनी यावेळी बोलून दाखवलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: By showing the dream of smart city bjp has done a lot of damage to pune city ajit pawar is angry msr
Show comments