पक्षाने महापौरपदासाठी सव्वा वर्षांची मुदत दिली असली तरी अडीच वर्षे पदावर कायम राहण्याचे संकेत देणारे विधान िपपरीच्या महापौर मोहिनी लांडे यांनी केले आणि या पदासाठी देव पाण्यात ठेवून बसलेल्या इच्छुक नगरसेविकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली.
िपपरीत अडीच वर्षांच्या महापौर आरक्षणासाठी खुल्या गटातील महिलांचे आरक्षण आहे. आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांना पहिल्या वर्षांसाठी संधी देण्यात आली, त्यास वर्ष पूर्ण झाले आहे. आणखी तीन महिन्यानंतर सव्वा वर्ष होईल व लांडे यांची मुदत संपून आपल्याला संधी मिळेल, या आशेवर राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेविका आहेत. तथापि, लांडे यांनी अडीच वर्षांची मुदत पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. ज्येष्ठतेच्या मुद्दय़ावर लांडे यांची वर्णी लागली, तेव्हा झामाबाई बारणे, नंदा ताकवणे, शमीम पठाण यांच्यासह नव्याने निवडून आलेल्या अनेक जणी स्पर्धेत होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखतींचा ‘फार्स’ करून लांडे यांच्या नावाची घोषणा केली होती. आमदार विलास लांडे यांनी सुरूवातीपासूनच अडीच वर्षांसाठी पद द्या, अशी मागणी केली होती. मंगला कदम व योगेश बहल यांनी अडीच वर्षांची मुदत रेटून पूर्ण केल्याचा दाखलाही लांडे समर्थकांकडून सातत्याने देण्यात येतो. त्यामुळे आगामी काळात लांडे राजीनामा देतील, अशी शक्यता नाही. लांडे यांना ताकवणे यांच्याकडून तीव्र स्पर्धा होईल म्हणूनच ताकवणेंच्या प्रभागातील नगरसेवक राजू मिसाळ यांना न मागता उपमहापौरपद देण्याची खेळी झाली होती.