कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे काम करू न शकणाऱ्या महिला आणि लेखापरीक्षकांच्या शोधात असणाऱ्या कंपन्या यांची सांगड घालून देण्याचे काम इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर अकाउंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) केले आहे. आयसीएआयतर्फे खास महिलांना कामाच्या संधीची माहिती देणारे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.
कंपनी सेक्रेटरीचा (सीए) अभ्यास करूनही अनेक महिलांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे काम किंवा नोकरी सोडून द्यावे लागते. पूर्णवेळ नोकरी करणे, लेखापरीक्षणासाठी विविध कंपन्यांना भेटी देणे अशा जबाबदाऱ्या सांभाळणे महिलांसाठी अवघड होते. त्याच वेळी अनेक कंपन्यांना लेखापरीक्षणाची प्राथमिक कामे करणारे किंवा फिरती नसलेली कामे करण्यासाठी मनुष्यबळाची गरज असते. या दोन्हीमध्ये दुवा साधण्यासाठी आयसीएआयने सदस्यत्व असलेल्या महिलांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले आहे. आयसीएआयच्या एकूण सदस्य संख्येपैकी २१ टक्के महिला आहेत.
या संकेतस्थळाच्या माध्यमातून लेखापरीक्षण करणाऱ्या कंपन्या, उद्योगक्षेत्रामध्ये लेखापरीक्षकांसाठी असलेल्या कामाच्या संधी यांची माहिती मिळणार आहे. सीए झालेल्या महिलांना प्रामुख्याने अर्धवेळ नोकरी, सोयीस्कर वेळेनुसार असलेल्या नोक ऱ्या, घरातून करता येऊ शकणाऱ्या कामाच्या संधी मिळणार आहेत. फिरती नसलेल्या कामाच्या जाहिराती या संकेतस्थळावर मिळतील. सदस्य महिलांनी आपली माहिती  http://womenportal.icai.org/ या संकेतस्थळावर नोंदवायची आहे.

Story img Loader