लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या बाजारांत कोबीची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने कोबीच्या दरात मोठी घट झाली आहे. घाऊक बाजारात एक किलो कोबीला सहा ते आठ रुपये भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पोषक वातावरणामुळे कोबीची लागवड चांगली झाली आहे. गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्रात कोबीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. मुंबई, पुण्यासह राज्यातील बाजार समितींच्या आवारात गेल्या आठवडाभरापासून कोबीची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त होत असल्याने कोबीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार एक किलो कोबीला सहा ते आठ रुपये भाव मिळाला आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो कोबीला २० ते २५ रुपये भाव मिळाला आहे.

गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी गुजरात, कर्नाटकातून मिळून दहा टेम्पो कोबीची आवक झाली, तसेच पुणे विभागातून पाच ते सहा टेम्पो आवक झाली. घाऊक बाजारात दहा किलो कोबीला प्रतवारीनुसार ६० ते ८० रुपये भाव मिळाला आहे. उत्पादन, तसेच वाहतूक खर्च न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दोन महिन्यांपूर्वी कोबीला घाऊक बाजारात प्रतवारीनुसार २० ते २५ रुपये किलो भाव मिळाला होता. चांगले भाव मिळाल्याने पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, तसेच नाशिक विभागातील शेतकऱ्यांनी कोबीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. सध्या बाजारात कोबीची आवक दुपटीने वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने दरात घट झाली आहे, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात कोबीला भाव मिळत नसल्याने परराज्यांतून शेतकऱ्यांकडून होणारी कोबीची आवक येत्या काही दिवसांत कमी होईल.

कोबीचे भाव

घाऊक बाजारात एक किलोचा भाव – ६ ते ८ रुपये
किरकोळ बाजारात एक किलोचा भाव – १५ ते २५ रुपये

Story img Loader