िपपरी पालिकेच्या विद्युत विभागातील अधिकारी व ठेकेदार यांच्या आर्थिक लागेबांध्यातून महापालिकेला लाखो रूपयांचा चुना लावण्याचे काम बिनबोभाट होत असताना व नव्या आयुक्तांना अद्याप त्याचा थांगपत्ता लागत नसताना विद्युतचे अभियंते व ठेकेदारांनी संगनमताने २७ लाखाची केबल गायब केल्याचे आणखी एक प्रकरण उजेडात आले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या एका माजी महापौराच्या पाठबळावर मोकाट सुटलेल्या ठेकेदाराचा हा उद्योग असून त्याच्याशी संगनमत करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
वाकड परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील महावितरण कंपनीचे खांब व तारा हलवण्यासाठी महापालिकेने अनमेक इलेक्ट्रिक प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले होते. त्यासाठी ठेकेदाराला पालिकेने विविध प्रकारच्या केबल उपलब्ध करून दिल्या होत्या. काम पूर्ण झाल्यानंतर त्याने उर्वरित केबल पालिकेकडे जमा करणे अपेक्षित असताना पालिकेच्या मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचे शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना निदर्शनास आणून दिले आहे. मुळातच अनमेक कंपनीला अवास्तव केबल देण्यात आल्या होत्या. साडेचार महिन्यांच्या विलंबाने अभियंत्यांनी या कामाचे अंतिम मोजमाप घेतले. शिल्लक केबल जमा करण्याच्या सूचनेला फाटा देऊन बरीच चालढकल करण्यात आली. जेव्हा केबल परत कराव्याच लागतील, असे स्पष्ट झाल्यानंतर ठेकेदाराने बनवाबनवी केली. फिनोलेक्सच्या ४३ लाखाच्या केबल परत करण्याऐवजी भलत्याच विशाल कंपनीच्या नावाच्या केबल परत केल्या. शिल्लक राहिलेली २७ लाखाची केबल परत दिल्याच नाहीत, असे सावळे यांनी म्हटले आहे.
–चौकट–
..अशी फसली टांग!
विद्युत विभागाच्या या ठेकेदाराने मध्यंतरी एका मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. पाठबळ देणाऱ्या माजी महापौराला मोठय़ा पडद्यावर झळकावले होते. मात्र, त्या नेत्याच्या राजकीय प्रतिस्पध्र्यानी विस्मृतीत गेलेले प्रकरण उघडकीस आणून ठेकेदाराची पुरती कोंडी केली आहे.