पुणे : शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल लक्षात घेऊन केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट, विश्वकर्मा विद्यापीठ यांच्यातर्फे गुणवत्तापूर्व शिक्षक घडण्यासाठी सेवापूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम असून, ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र पद्धतीने हा अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे.

केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड अससेसमेंटच्या दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण राजमणी, विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ जबडे यांनी या अभ्यासक्रमाबाबतची माहिती दिली. चार महिने मुदतीच्या या अभ्यासक्रमात प्रत्यक्ष वर्गशिक्षणासह कार्यप्रशिक्षणाचाही समावेश आहे. या अंतर्गत नावीन्यपूर्ण अध्यापन कौशल्ये, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अध्यापन तंत्रे, तंत्रज्ञानाचा वापर, बालमानसिकता, मूल्यमापन पद्धती, वैयक्तिक अध्यापन अशा विविध घटकांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

राजमणी म्हणाले, जगभरातच शिक्षकांची कौशल्यवृद्धी करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षण क्षेत्रात बदल होत असताना शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी सेवापूर्व प्रशिक्षण गरजेचे आहे. बी.एड. झालेले उमेदवार, शिक्षक होऊ इच्छिणारे उमेदवार यांच्यासाठी हा अभ्यासक्रम मार्गदर्शक आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला असून, देशभरातील कोणालाही अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. गरजेनुसार बदल करून तो अन्य देशांमध्येही राबवणे शक्य आहे. तसेच सरकारच्या सहाय्यानेही हा अभ्यासक्रम राबवला जाऊ शकतो.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात बदल होऊ घातले आहेत. त्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. चांगले शिक्षक घडवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे बीएड अभ्यासक्रमापलीकडे जाऊन प्रशिक्षण गरजेचे झाले आहे. त्या दृष्टीने सेवापूर्व प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. सर्व भाषा माध्यमांतील उमेदवारांना हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. शिक्षकांनी कौशल्ये आत्मसात करणे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे, असे डॉ. जबडे यांनी सांगितले.

Story img Loader