एसटीचे वाहक व चालक तणावापासून दूर रहावेत व त्यांचे कौटुंबिक व आरोग्यासंबंधीच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने व प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या सहकार्याने वाहक व चालकांसाठी राज्यभरात विशेष शिबिरे सुरू करण्यात आली आहेत.
वाहक व चालकांमध्ये ताण निर्माण झाल्यास सहाजिकच त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो. त्याचप्रमाणे कौटुंबिक वातावरण व आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. वाहक व चालक ताणतणावांपासून मुक्त झाल्यास त्यांच्या कामात सुधारणा होऊन त्याचा फायदा चांगली प्रवासी सेवा देण्याच्या दृष्टीने होऊ शकतो, याच उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाने हा उपक्रम सुरू केला आहे.
एसटीच्या राज्यातील ३० विभागांमधील वाहक चालकांसाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या स्थानिक शाखेमार्फत आठवडय़ातून दोन दिवस विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून वाहक व चालकांच्या समस्यांकडे वैयक्तिक लक्ष देण्यात येत आहे. सर्व विभागातील प्रत्येकी १५ वाहक व चालकांना दिवसभर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ही शिबिरे पुढील आठ ते नऊ महिने राबविण्यात येणार असून, एसटीच्या सुमारे ३५ हजार चालकांना व ३४ हजार वाहकांना त्याचा लाभ होऊ शकेल.  

Story img Loader