स्थानिक संस्था कराच्या (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) प्रचारासाठी काँग्रेसने शहरात मोहीम सुरू केली असून एलबीटीसंबंधीचे गैरसमज दूर व्हावेत यासाठी शहरात प्रमुख चौकांमध्ये होर्डिगही लावण्यात आली आहेत.
काँग्रेसचे महापालिकेतील गटनेता आणि विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे यांनी पुढाकार घेऊन ही मोहीम सुरू केली असून या प्रचारामुळे गैरसमज दूर करण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सोमवारी सांगितले. एलबीटीबाबत व्यापाऱ्यांमध्ये चुकीची माहिती पसरवण्यात आली आहे. एलबीटीमधील अनेक तरतुदीच अद्याप व्यापाऱ्यांपर्यंत योग्यप्रकारे पोहोचलेल्या नाहीत. तसेच व्यापाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या असल्या, तरी ती माहितीही त्यांच्यापर्यंत पोहोचली नसल्यामुळे एलबीटीला विरोध होत असल्याचे लक्षात आले. त्यासाठी ही मोहीम सुरू केल्याचे शिंदे म्हणाले.
व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये जाऊन तपासणी करण्याचे अधिकार अद्याप आयुक्तांनाही देण्यात आलेले नाहीत, तसेच शहराच्या बाहेरून आणलेल्या मालावरच एलबीटी लागू आहे, शहरातल्या शहरात विक्री होणाऱ्या मालावर एलबीटी लागू नाही, जकातीत जेवढय़ा वस्तूंना करमाफी होती, त्याहीपेक्षा अधिक वस्तूंना करमाफी देण्यात आली आहे, अनेक महापालिकांमध्ये सन २०१० पासूनच एलबीटी लागू झाला आहे अशा प्रकारची माहिती देणारे फलक प्रमुख चौकांमध्ये लावल्याचीही माहिती शिंदे यांनी दिली. व्यापाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर गैरसमज दूर होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा