पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढली असली, तरी बाजारात राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे, तसेच राष्ट्रवादीची उपरणी आणि घडय़ाळाचे चिन्ह असलेल्या प्रचार साहित्याला चांगली मागणी आहे. त्या तुलनेतभाजप, शिवसेना, काँग्रेस आणि मनसे तसेच इतर पक्षांच्या प्रचार साहित्याला तूर्त तरी विशेष मागणी नाही. मात्र निवडणुकीमुळे सर्वपक्षीय प्रचार साहित्याच्या खरेदीची तयारी सुरू झाली असून सध्या त्यासंबंधीची चौकशीही विक्रेत्यांकडे सातत्याने होत आहे.

महापालिका निवडणूक फेब्रुवारीत होणार हे माहिती असल्यामुळे गेल्या महिनाभरापासून पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुकीचे वातावरण तयार झाले होते. राजकीय नेत्यांच्या सभा, कार्यकर्त्यांचे मेळावे, विकासकामांची उद्घाटने आदी ठिकाणी पक्षाचे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून त्या-त्या पक्षाचे झेंडे, उपरणे, बॅच, टोप्या आदी साहित्य वापरले जात होते. भारतीय जनता पक्षामध्ये आमदार महेश लांडगे, आझम पानसरे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. भाजपमध्ये पक्षप्रवेश मोठय़ा संख्येने होत असले, तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वातावरण निर्मितीसाठी सर्वात जास्त प्रचार साहित्य खरेदी केल्याचे विक्रेत्यांकडून समजले. भोसरी मतदारसंघात मात्र भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या प्रचार साहित्याला समान मागणी आहे.

बहुतांश पक्षांच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रचाराचे साहित्य खरेदी केले जात असले, तरी कार्यकर्त्यांपर्यंत ते पोहोचत नसल्याने कार्यकर्ते आणि उमेदवार वैयक्तिक खर्चातूनही बाजारातून प्रचार साहित्य खरेदी करतात. अशा खरेदीकडे मोठा कल असल्याचे दिसत आहे. बाजारामध्ये सर्व पक्षांच्या साध्या झेंडय़ांची किंमत आकारमानाप्रमाणे १० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत आहेत. शिवाय सॅटीन (सेमी सिल्क) कापडामधील झेंडय़ांची किंमत ६५ रुपयांपासून ते १४० रुपयांपर्यंत आहे. तर सर्वपक्षीय उपरणी किंवा मफलरची किंमत सरासरी २० रुपये इतकी आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचार साहित्याची विक्री करणारी आठ ते दहा दुकाने आहेत. या सर्व दुकानांमध्ये प्रचार साहित्य विक्री वाढली असून उलाढालही वाढली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीपेक्षा या वर्षी प्रचाराच्या साहित्याला उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांकडून जास्त मागणी येणार असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.