लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पुणे परिमंडलातील ५ लाख ११ हजार ६१४ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही १०२ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी असून ती त्वरित भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तर, वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा केला नसल्याने मार्च महिन्यात आतापर्यंत २२ हजार ८१६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
दरम्यान, वीजग्राहकांना चालू आणि थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र गुरुवारी (३० मार्च) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या ऑनलाईन भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपद्वारे सोय उपलब्ध आहे.
आणखी वाचा- पुणे: वानवडीत दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड करणारे टोळके गजाआड
महावितरणची संपूर्ण आर्थिक मदार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसूलीवरच आहे. वीजबिलांच्या वसूलीमधूनच वीजखरेदीसह विविध देणी दरमहा द्यावी लागतात. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसूलीला मोठा वेग देण्यात आला आहे. गेल्या २७ दिवसांमध्ये पुणे शहरातील १६ हजार ८० थकबाकीदारांचा, पिंपरी चिंचवडमधील ३ हजार ६१६ थकबाकीदारांचा तर, ग्रामीण भागात ३ हजार १२० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.