पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील बंडखोरी शमविल्यानंतर आता भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीच्या प्रचाराचा बुधवारी प्रारंभ होणार आहे. चिंचवडचे भाजप उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ फडणवीस यांची कस्पटे वस्ती, काळेवाडी फाटा येथे सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा होणार आहे.
चिंचवडमध्ये शंकर जगताप, तर भोसरीत महेश लांडगे हे भाजपचे उमेदवार आहेत. तर, पिंपरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे उमेदवार आहेत. चिंचवडमध्ये महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नाना काटे यांनी बंडखोरी केली होती. ती शमविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. काटे यांना दूरध्वनी करून माघार घेण्याची सूचना केली. त्यानुसार काटे यांनी माघार घेतली. शंकर जगताप यांना उमेदवारी दिल्याने भाजप पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी होती. पक्षातील नाराजी दूर करण्यात काही प्रमाणात यश आले आहे. मात्र, अद्यापही काही पदाधिकारी नाराज असल्याचे दिसते. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस काळेवाडीत सभा घेणार आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या सभेनंतर नाराजी दूर होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा – पुणे : शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची २० लाखांची फसवणूक
हेही वाचा – निवडणूक प्रचारात सहभागी झाल्यास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर कारवाई… काय आहे निर्णय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील सहा दिवसांत २१ सभा घेणार आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातही या सभा होणार आहेत. या सभांचा शुभारंभ उद्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील काळेवाडी फाटा येथील सभेतून होणार आहे. या सभेला चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले) यांच्यासह मित्रपक्ष महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी महायुतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.