एक कोटी रुपयांच्या आसपास किंवा जास्त किंमत असलेली ‘मर्सिडीज-बेन्झ’ची मोटार खरेदी करायची असेल तर आता या दालनापर्यंत वेळ घालवून मोटारीने जायची गरज नाही, त्यासाठी कंपनीकडून खास हेलिकॉप्टरची व्यवस्था केली जाणार आहे. पुण्याजवळ चाकण येथे या कंपनीच्या आवारात नव्याने सुरू झालेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ तर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सेवांमध्ये या हेलिकॉप्टर सेवेचाही समावेश आहे.. याद्वारे कंपनीतर्फे जर्मनीमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा आता भारतीय ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.
उच्चभ्रू ग्राहकांना आणखी उच्चभ्रू सेवा पुरविण्यासाठी कंपनीच्या वतीने चाकण येथे भव्य ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मर्सिडीज बेन्झ इंडियाचे अध्यक्ष मथायस ल्यूहर्स आणि मर्सिडीज बेन्झ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ एबरहार्ड कर्न यांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्या वेळी अशा अनेक सेवांची माहिती देण्यात आली.
जर्मनीतील ग्राहकांना मर्सिडीजतर्फे दिली जाणारी सेवा भारतातील ग्राहकांनाही देता यावी या उद्देशाने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची सुरुवात चाकण येथे कंपनीच्या आवारात करण्यात आली आहे. ‘हेलिकॉप्टर सेवा’ हा त्याचाच एक भाग आहे. त्यासाठी कंपनीच्या आवारामध्ये हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. पुण्याबाहेरील ग्राहक स्वत:चे हेलिकॉप्टर घेऊन गाडी खरेदीसाठी येऊ शकतात. किंवा मागणीनुसार कंपनीकडूनही हेलिकॉप्टरची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय ग्राहकांना कंपनीजवळ ‘ऑफ रोड ट्रॅक’ वर एसयूव्ही रेंजच्या मोटारी व इतर गाडय़ांची टेस्ट राईड देखील घेता येणार आहे. आपणाला हवी असलेली मोटार आपल्याला हवी तशी म्हणजेच ‘पर्सनलाईज्ड’ही करून दिली जाणार आहे. याशिवाय गाडीच्या सीटचे चमडे, शिवणीचे टाके आणि पेडल्स या गोष्टी ग्राहक आपल्या पसंतीनुसार निवडू शकतील. ग्राहकांना संपूर्ण मर्सिडीज बेन्झ मोटारी डिजिटली पाहता येणार आहेत. या केंद्रामध्ये ९० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या एसएलएस एमजी, एसएलके ५५ एएमजी, ई ६३ एएमजी, एसएलके क्लास आणि सीएलएस क्लास या मालिकेच्या मोटारी ठेवण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त ग्राहकांना कंपनी पाहण्याची संधीही मिळू शकेल.
अमेरिका-युरोपपेक्षा भारतात चांगली कामगिरी
कंपनी युरोप आणि अमेरिकेपेक्षा भारतामध्ये चांगली कामगिरी करीत आहे. सन २०१४ मध्ये मर्सिडीजची काही नवीन मॉडेल्स बाजारात येणार आहेत. पुढील वर्षी भारतामधली मर्सिडीजच्या वितरकांची संख्याही वाढविण्यात येणार आहे.
– मथायस ल्यूहर्स
अध्यक्ष, मर्सिडीज बेन्झ इंडिया