पुणे : आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता पुणे लोकसभा मतदारसंघाचे मतदान होईपर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड, पुरंदर, बारामती आणि इंदापूर या तालुक्यांसाठी ग्रामीण भागात उन्हाळी आवर्तनाच्या माध्यमातून दोनवेळा चार आणि तीन टीएमसी पाणी देण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला.
शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या धरणांमध्ये सध्या १६.१० टीएमसी (५५.२१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करताना आणि पावसाळ्यापर्यंत धरणांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे.
हेही वाचा…पुण्यातील नवले पुलाजवळ भरधाव ट्रकने सात ते आठ वाहनांना दिली धडक
या पार्श्वभूमीवर कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवारी पार पडली. मात्र, लोकसभा निवडणूक लक्षात घेता शहरात पाणीकपात केल्यास पुणेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे तूर्त पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघाचे मतदान झाल्यानंतर पाणीकपात करावी लागणार असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तूर्त नेहमीप्रमाणेच पुणे शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट! राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष?
तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांपैकी बारामती, पुरंदर, दौंड आणि इंदापूर हे चार मतदारसंघ येतात. त्यामुळे ग्रामीण भागासाठी देखील उन्हाळी आवर्तनातून दोनवेळा पाणी देण्यात येणार आहे. खडकवासला धरणातून नवीन मुठा उजवा कालव्यातून पहिले आवर्तन ३ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यात चार टीएमसी, तर दूसऱ्या आवर्तनात तीन असे एकूण सात टीएमसी पाणी देण्यात येणार आहे.