पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असताना मोशी येथे नव्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा घाट कशासाठी घातला आहे. सल्लागाराच्या नावाखाली ७ कोटी ९६ लाख रुपयांची उधळण आयुक्त कोणाच्या सांगण्यावरून करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेचा कष्टाचा पैसा मनमानी पद्धतीने उधळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी ४०० कोटींचा खर्च गृहीत धरून स्टेडियम उभारण्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. याला जवळपास १.९९ (निविदा पूर्व १.९८ टक्के तर निविदा पश्‍चात ०.१ टक्के) ओम टेक्‍नॉलिक्‍स कंपनीला देण्याचे ठरविले आहे. मोशीतील प्रभाग क्रमांक तीन येथील आरक्षण क्र.१/२०४ येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणे. या कामासाठी सन २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात ४०० कोटी रुपयांस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने स्टेडियम उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती देण्यास आयुक्त सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

हेही वाचा – पुणे : कोयता हल्ल्यात तरूणीला वाचविणाऱ्या युवकांचे फडणवीस यांच्याकडून कौतुक

पुणे जिल्ह्यात पुणे, गहुंजे व बारामती अशी तीन क्रिकेट स्टेडियम आहेत. पिंपरी-चिंचवड शहरालगत गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असताना नव्याने क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा घाट कोणाच्या सांगण्यावरून घातला जात आहे. यामागे राज्यातील सत्तेत असणारे खोके सरकार व त्यांचे स्थानिक पदाधिकारी हे अंतर्गत आर्थिक तडजोडी करून प्रशासनाला हाताशी धरून शहरातील जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करत असल्याचा संशय नाना काटे यांनी व्यक्त केला आहे. तसेच नव्याने विकसित करणारे क्रिकेट स्टेडियम बीओटी, पीपीई, खासगी की पालिकेच्या निधीतून करायचे हे अद्याप निश्‍चित झालेले नसले तरी त्यांच्या सल्लागारासाठी कोट्यावधीची उधळपट्टी आणि क्रिकेट स्टेडियमचा घातलेला घाट तात्काळ रद्द करा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन उभारणार, असा निर्वाणीचा इशारा नाना काटे यांनी दिला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cancel the moshi cricket stadium project immediately otherwise ncp warns kjp 91 ssb
Show comments