पुणे : जगात सर्वाधिक वापरला जाणारा कृत्रिम स्वीटनर ॲस्पारटेम हा कर्करोगाला कारणीभूत ठरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) पुढील महिन्यात अधिकृत घोषणा होणार आहे. त्यामुळे आगामी काळात खाद्यपदार्थ उद्योगांमध्ये त्याचा वापर बंद होण्याची शक्यता आहे.
कोका कोलाच्या डाएट सोडापासून अनेक शीतपेये आणि खाद्यपदार्थांमध्ये ॲस्पारटेम या कृत्रिम स्वीटनरचा वापर केला जातो. या स्वीटनरचा वापर केल्याने कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डब्ल्यूएचओचा कर्करोग संशोधन विभाग ‘इंटरनॅशनल एजन्सी ऑफ रिसर्च ऑन कॅन्सर’कडून (आयएआरसी) ॲस्पारटेम हा मानवासाठी कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो, अशी घोषणा जुलैमध्ये होऊ शकते.
आयएआरसीच्या बाह्य तज्ज्ञांची बैठक या महिन्याच्या सुरुवातीला झाली. यात ॲस्पारटेम कृत्रिम स्वीटनर धोकादायक आहे की नाही, यावर आतापर्यंत उपलब्ध असलेल्या महत्त्वाच्या संशोधनाच्या आधारे चर्चा करण्यात आली. त्याच वेळी ॲस्पारटेम कर्करोगास कारणीभूत ठरत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. परंतु, कृत्रिम स्वीटनर नेमका किती घेणे सुरक्षित आहे, यावर चर्चा झालेली नाही. खाद्यपदार्थांमधील कृत्रिम घटकांबाबत डब्ल्यूएचओने नेमलेल्या समितीकडून नियामकांशी याबाबत चर्चा केली जाणार आहे.
कृत्रिम स्वीटनर उद्योगाचा आक्षेप
कृत्रिम स्वीटनर उद्योगाकडून याला आक्षेप घेण्यात आला आहे. ‘इंटरनॅशनल स्वीटनर्स असोसिएशन’ने आयएआरसी ही अन्नसुरक्षा संस्था नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. ॲस्पारटेमबाबतचे संशोधन पुरेसे शास्त्रीय नसून, केवळ सध्या उपलब्ध असलेल्या वरवरच्या संशोधनाचा यासाठी आधार घेण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. याच वेळी अनेक मोठ्या खाद्यपदार्थ कंपन्यांनीही याला विरोध दर्शविला आहे.
हेही वाचा – पिंपरी : चिखली पोलीस ठाण्याला मिळणार हक्काची जागा, ‘या’ ठिकाणी होणार नवीन पोलीस ठाणे
अनेक चित्रपट तारे कृत्रिम स्वीटनरची जाहिरात करताना दिसतात. ते पाहून सामान्य नागरिकही त्यांचा वापर करतात. मात्र, त्यांचे तोटे त्यांना माहिती नसतात. याचबरोबर आरोग्याबाबत जागरूक असलेले अनेक जण गरज नसताना हौसेने त्यांचा वापर करतात. कृत्रिम स्वीटनर हे जास्त प्रमाणात घेतल्यास आरोग्यासाठी घातक आहे, असा इशाराही त्यांच्यावर छापायला हवा. – डॉ. अविनाश भोंडवे, आरोग्यतज्ज्ञ