जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भाषा, शिक्षणाचे माध्यम असलेल्या मराठी शाळा आणि संस्कृतीच्या संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी आपल्याला मुळाकडे म्हणजेच संतसाहित्याकडे जाण्याची आवश्यकता आहे. आधुनिक वाङ्मयीन परंपरा हा संतपरंपरेचा धागा आहे अशीच माझी धारणा असून हेच मी गेली चार दशके लेखनातून मांडत आलो आहे. या भूमिकेवर घुमान येथील संमेलनाच्या व्यासपीठावरून शिक्कामोर्तब व्हावे या उद्देशातूनच संमेलनाध्यक्षपदाच्या िरगणात उतरत असल्याचे सांगत संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी सोमवारी आपली उमेदवारी जाहीर केली.
पंजाबमधील संत नामदेवांच्या कर्मभूमीत घुमान येथे एप्रिलमध्ये होत असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संत तुकाराममहाराजांचे वंशज असलेले डॉ. सदानंद मोरे उभे राहात आहेत. संतसाहित्य आणि आधुनिक साहित्य यांना जोडणारा दुवा असून ‘उंबरठय़ावर’च्या पिढीचा प्रतिनिधी या नात्याने मी ही निवडणूक लढवित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घुमान येथे संमेलन घेत मराठी खऱ्या अर्थाने आंतरभारती भाषा असल्याचे सिद्ध होणार आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. सुबुद्ध मतदारांवर माझा विश्वास आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहण्यामागची भूमिका मी विश्वासपत्रातून मांडली असल्याचेही त्यांनी सांगितले. मी भूमिका घेणारा साहित्यिक असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्यिकाने भूमिका घ्यावी अशी लोकांची अपेक्षा असते. काही गोष्टी आवडल्या नाहीत तरी लोकांसाठी कराव्या लागतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संमेलनाध्यक्ष बिनविरोध झाला तर उत्तमच आहे. एकमत होत असेल तर, स्पर्धा टळते आणि एकमेकांविषयी उणी-दुणी टाळली जातात. पण, तसे घडलेच पाहिजे असा आग्रह धरणे चुकीचे आहे. तंटामुक्त आणि निवडणूकमुक्त प्रक्रिया ही चांगली गोष्ट आहे, असे सांगून मोरे म्हणाले, संमेलनाचे संयोजक या नात्याने राजकीय व्यक्तींनी व्यासपीठावर येण्यास हरकत घेण्याचे कारण नाही. संमेलनातील वैचारिक निष्पत्तीवर भर दिला पाहिजे. एवढे लोक येत असल्याने उत्सव होणार हे नक्की असले तरी संमेलनावर होणारा खर्च हा तारतम्याचा भाग आहे. साहित्य संमेलनाकडे पाहण्याची विद्रोही चळवळीची मूल्यव्यवस्थेची चौकट आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ती भूमिका महत्त्वाची आहे. पण, त्याच भूमिकेतून सर्वानी पाहिले पाहिजे, असे नाही.
प्रकाशकही महत्त्वाचे
लेखक लिहितात ते प्रकाशात आणण्याचे काम करणारे प्रकाशक हे ग्रंथव्यवहारातील महत्त्वाचे घटक आहेत. पण, कोणी बोलावले नाही तरी आपणहून जावे अशी घुमान, तंजावर ही स्थळे आहेत. त्यामुळे विक्री-खरेदी, नफा-तोटा हे न पाहता प्रकाशकांनी या संमेलनामध्ये सहभागी व्हावे असेच आपल्याला वाटते, असेही मोरे यांनी सांगितले.
समस्यांच्या सोडवणुकीसाठी संतसाहित्याकडे जाण्याची आवश्यकता
पंजाबमधील संत नामदेवांच्या कर्मभूमीत घुमान येथे एप्रिलमध्ये होत असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संत तुकाराममहाराजांचे वंशज असलेले डॉ. सदानंद मोरे उभे राहात आहेत.
First published on: 26-08-2014 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidacy of dr sadanand more